हा तर सरकारने केलेला सदोष मनुष्यवध - उद्धव ठाकरे

By admin | Published: May 12, 2017 07:43 AM2017-05-12T07:43:34+5:302017-05-12T07:56:02+5:30

काश्मीर खो-यात पसरलेल्या अशांततेवर बोट ठेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे

This is the government's faulty humiliation - Uddhav Thackeray | हा तर सरकारने केलेला सदोष मनुष्यवध - उद्धव ठाकरे

हा तर सरकारने केलेला सदोष मनुष्यवध - उद्धव ठाकरे

Next

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 -  दक्षिण काश्मीरच्या सोपियान जिल्ह्यात उमर फैयाज या तरुण लष्करी अधिकाऱ्याचे सहा दहशतवाद्यांनी अपहरण करुन हत्या केली. काश्मीर खो-यात पसरलेल्या अशांततेवर बोट ठेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.  
 
उमर फय्याज हा कश्मीरातील राष्ट्रभक्त तरुणांच्या आशा-आकांक्षेची ज्वाला होता. या ज्वालेवर फुंकर मारणाऱ्यांना आपण कोणते शासन करणार आहोत?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.  शिवाय, देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री सापडू नये हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबाच म्हणायला हवा, असा टोलाही त्यांनी हाणला आहे. 
 
तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांची अवहेलना करणारे वक्तव्याचाही सामना संपादकीयमधून समाचार घेण्यात आला आहे.  सरकार पक्षाचे लोक ज्या ढिलाईने आणि मस्तवालपणे किसानांच्या व जवानांच्या बाबतीत वागत आहेत तो सर्व प्रकार पाहता या देशात राज्यकर्त्यांचा मानसिक घोटाळा झाला आहे व त्या घोटाळ्य़ात देश पूर्ण फसला आहे, असे सांगत उद्धव यांनी "वर्षभरात कित्येक सैनिकांना द्यावे लागलेले बलिदान हा सरकारने केलेला सदोष मनुष्यवध आहे", अशी बोचरी टीकाही केली आहे.  
 
काय आहे सामना संपादकीय?
कश्मीर खो-यात सध्या जे सुरू आहे ते आपल्या देशाच्या सार्वभौमतेला काळिमा फासणारे आहे. कश्मीरचेच सुपुत्र असलेल्या उमर फय्याज या लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण करून हत्या करणा-या दहशतवाद्यांनी हिंदुस्थानच्या लष्करालाच आव्हान दिले आहे. काही दिवसांपूर्वीच आमच्या दोन जवानांची मुंडकी पाकड्डा सैनिकांनी उडवून देशाची बेअब्रू केली. सैनिकांच्या शिरच्छेदाचा बदला घेऊ हे इशारे हवेत विरण्याआधीच बुधवारी लेफ्टनंट उमर फय्याज यांचे अपहरण व नंतर हत्या करून त्यांचा छिन्नविच्छिन्न देह फेकून देण्यात आला. नेहमीप्रमाणेच सरकारने या हत्येचा निषेध केला आहे. हे कृत्य भ्याडपणाचे असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे नक्राश्रू ढाळले गेले आहेत. उमर फय्याज हा तरुण लष्करी अधिकारी कुटुंबातील एका विवाह सोहळ्यासाठी रजेवर आला होता. अतिरेक्यांनी या निःशस्त्र लष्करी अधिकाऱ्याचे लग्नमंडपातूनच अपहरण केले आणि थंड डोक्याने डोक्यात, पोटात आणि छातीत गोळ्या घालून त्याची क्रूर हत्या केली आहे. कारण केवळ एकच. उमर फय्याज हिंदुस्थानी लष्करात सामील झाला होता. कश्मीरातील तरुणांनी हिंदुस्थानी लष्कराशी लढायचे, हिंदुस्थानी जवानांचे प्राण घ्यायचे,

हिंदुस्थानी लष्करावर दगडफेक करायची
हे पाकिस्तानचे जेहादी तत्त्वज्ञान अलीकडच्या काळात कश्मीरात पुन्हा वेगाने फोफावू लागले आहे. उमर फय्याजने हा चुकीचा मार्ग तर निवडला नाहीच, उलट दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठीच तो लष्करात दाखल झाला. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी लेफ्टनंट झाला. कश्मीरातील देशद्रोह्यांना हेच सहन झाले नाही. कश्मीर खोऱ्यातील तरुणांचे ‘रोल मॉडेल’ म्हणून उमर फय्याज यांची ओळख होती. एका बाजूला तरुणवर्ग माथेफिरू बनून हिंसाचार करीत आहे. दहशतवाद्यांच्या टोळीत शिरून सैनिकांवर हल्ला करीत आहे. अशा वातावरणात उमर फय्याज हा तरुण लष्करात भरती होऊन राष्ट्रीय कार्यासाठी त्याच दहशतवादाविरुद्ध जंग पुकारतो हे चित्र आशादायक वाटत असतानाच अतिरेक्यांनी उमरची हत्या केली आहे. सरकारने एका चकमकीत अश्रफ वाणीसारख्या हिजबुल कमांडरला खतम केले. त्या चकमकीचे पडसाद कश्मीर खोऱयात आजही उमटत आहेत. अश्रफ वाणी हा बहकलेल्या तरुणाचा पोस्टरबॉय होता. पण उमर फय्याज हा कश्मीरातील राष्ट्रभक्त तरुणांच्या आशा-आकांक्षेची ज्वाला होता. या ज्वालेवर फुंकर मारणाऱ्यांना आपण कोणते शासन करणार आहोत? संरक्षणमंत्री पदाचा खांदेपालट होऊन तीन महिन्यांचा कालखंड लोटला आहे. पण

देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री
अद्याप तरी मिळाला आहे काय? याबाबत जनतेच्या मनात शंका आहे. अरुण जेटली हे आजही देशाचे अर्थमंत्री व संरक्षणमंत्री आहेत. इतक्या मोठय़ा देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री सापडू नये हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबाच म्हणायला हवा. अर्थात हे कर्म जनतेचेच आहे व त्या कर्माचे फळ आमच्या सैनिकांना भोगावे लागत आहे. सरकार पक्षाचे लोक ज्या ढिलाईने आणि मस्तवालपणे किसानांच्या व जवानांच्या बाबतीत वागत आहेत तो सर्व प्रकार पाहता या देशात राज्यकर्त्यांचा मानसिक घोटाळा झाला आहे व त्या घोटाळय़ात देश पूर्ण फसला आहे. देशाच्या तारणहारांच्या भूमिकेत आज जे वावरत आहेत त्यांना शेतकऱयांचा आक्रोश ऐकू येत नाही व जवानांच्या हत्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दबलेल्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत. वर्षभरात कित्येक सैनिकांना द्यावे लागलेले बलिदान हा सरकारने केलेला सदोष मनुष्यवध आहे. या मनुष्यवधाची वेदना ज्यांना बोचत नाही त्यांचे मानसिक संतुलन कोलकाता न्यायालयाच्या न्या. करननप्रमाणे बिघडले आहे काय? वेड्यांनाही वाटते की मी सोडून सारे जग म्हणजे वेडय़ांचा बाजार आहे. सध्या तसे काही घडत असेल तर रावसाहेब दानव्यांप्रमाणे ‘साले’ वगैरे शिव्या देऊनही गप्प बसता येणार नाही. या मानसिक घोटाळय़ांतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा लागेल!

Web Title: This is the government's faulty humiliation - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.