‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का...?’
By admin | Published: April 21, 2015 01:17 AM2015-04-21T01:17:49+5:302015-04-21T01:17:49+5:30
‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा प्रश्न केंद्रातील व राज्यातील सत्तारूढ आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सोमवारी सरकारला विचारला.
कोल्हापूर : ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा प्रश्न केंद्रातील व राज्यातील सत्तारूढ आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सोमवारी सरकारला विचारला.
राज्यात अवकाळी पावसानंतर फक्त तीनच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा अहवाल केंद्र सरकारला देण्यात आला आहे. त्यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी सरकारवर तोंडसुख घेतले.
खा. शेट्टी म्हणाले, आत्महत्या करणाऱ्या अनेक शेतकरी कुटुंबांना मी व माझ्या सहकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. हृदय पिळवटून टाकणारे दृश्य आणि परिस्थिती असताना, घरात बसून अहवाल तयार करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना सरकार पाठीशी घालणार असेल, तर सरकारच्या संवेदनशीलतेबद्दलच आता संशय घ्यायला जागा निर्माण झाली आहे. जे काही वास्तव असेल, त्याचा अहवाल तयार केला जावा व तो सरकारला कळविला पाहिजे.
काँग्रेस आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. आताच्या सरकारमधील नेते फक्त भाषणे देत आहेत. भाषणे ऐकून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हव्यात, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)