‘कामगारांना देशोधडीला लावण्याचा सरकारचा डाव’
By admin | Published: May 2, 2017 04:09 AM2017-05-02T04:09:22+5:302017-05-02T04:09:22+5:30
उद्योगपतींच्या सोयीसाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार
मुंबई : उद्योगपतींच्या सोयीसाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करत असून काँग्रेस पक्ष कामगारांच्या हिताच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त अशोक चव्हाण यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना वंदन केले. त्यानंतर टिळक भवन येथे त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून काँग्रेस सरकारने केलेल्या विकास कामांमुळे महाराष्ट्र प्रगत राज्य झाले.
काँग्रेस सरकारने राबविलेल्या धोरणामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्याची भरभराट झाली. लोकांना रोजगार मिळाला. काँग्रेस सरकारने कायम कामगारांच्या हिताचे रक्षण केले. पण केंद्रातले आणि राज्यातले भाजप सरकार कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्ष कामगारांच्या व कष्टकऱ्यांच्या हितासाठी या सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करेल, असेही चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी बोलताना महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केंद्रातले सरकार कामगारांच्या सुरक्षेवर हल्ला करत असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तयार राहावे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
यावेळी माजी मंत्री कृपाशंकर सिंह, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारूलता टोकस, प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र दळवी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामकृष्ण ओझा यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)