‘शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष’
By admin | Published: April 20, 2015 03:09 AM2015-04-20T03:09:48+5:302015-04-20T03:09:48+5:30
केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार केवळ घोषणा करीत असून, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे
मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार केवळ घोषणा करीत असून, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी केला़
खासदार चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यात दुष्काळ आणि गारपिटीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना २ टक्क्यांपेक्षा जास्त मदत करता येणार नसल्याचे वक्तव्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरात केले होते़ त्यांची ही भाषा म्हणजे शेतकऱ्यांप्रती भाजपा सरकारच्या अनास्थेचा पुरावाच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी त्यांनी पत्रकात केली आहे़ राज्यातील नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत. अशावेळी शेतकऱ्याला भरीव आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी देण्याऐवजी केवळ २ टक्के मदत दिली जाईल, असे सांगणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच म्हणावी लागेल. केंद्र आणि राज्यात नवे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांना मदतीचा हात तर सोडाच पण नैसर्गिक आपत्तीतून बचावलेल्या शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळणेही कठीण झाल्याचा आरोप खासदार चव्हाण यांनी पत्रकात केला आहे़