शेतकऱ्यांचे मरण, हेच सरकारचे धोरण
By admin | Published: October 26, 2015 02:30 AM2015-10-26T02:30:49+5:302015-10-26T02:30:49+5:30
सध्या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कारभार सुरू आहे. भगवेकरणाचा योजनाबद्ध कार्यक्रम सुरू आहे.
अहमदनगर : सध्या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कारभार सुरू आहे. भगवेकरणाचा योजनाबद्ध कार्यक्रम सुरू आहे. एकही घटक सुखी नाही. भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचे मरण, हेच या सरकारचे धोरण आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याचा ३८ वा गळीत हंगाम व विस्तारीत सहवीज प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी पवार यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, सध्याचे भाजपा सरकार शेतकऱ्यांचा विचार करण्यास तयार नाही. कर्जमाफी नाकारुन शेतकरी समृद्ध करण्याच्या बाता मारल्या जात आहेत.
एकीकडे ८ हजार कोटींची मदत केल्याचे सांगताना दुसरीकडे तिजोरीत पैसाच नाही, असेही म्हणतात. यात खरे काय मानायचे? या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.
लातूर जिल्ह्यात बसच्या पाससाठी २६० रुपये नाहीत म्हणून गरीब विद्यार्थिनीला आत्महत्या
करावी लागते, हेच का या सरकारचे अच्छे दिन?, असा सवालही
त्यांनी केला. बहुजन व मुस्लीम समाजाला स्थान नसलेले हे
मूठभर लोकांचे सरकार आहे, अशी टिकाही त्यांनी केली. राजू शेट्टी, जानकरांनाही बाजूला ठेवल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)