राज्यपालांचा ठाकरे सरकारला पहिला धक्का, बंडानंतरच्या कोट्यवधींच्या जीआरची माहिती मागवली; चौकशी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 10:00 AM2022-06-28T10:00:44+5:302022-06-28T10:02:53+5:30
महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरू असताना कोरोनाची लागण झाल्यामुळे या सर्व प्रकरणापासून दूर असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आता एन्ट्री झाली आहे.
मुंबई-
महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरू असताना कोरोनाची लागण झाल्यामुळे या सर्व प्रकरणापासून दूर असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आता एन्ट्री झाली आहे. कोरोनावर मात केल्यानंतर राज्यपाल कोश्यारी आता अॅक्शनमोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. कारण कामावर रुजू होताच राज्यपालांनी ठाकरे सरकारला पहिला दणका दिला आहे. मागील सात दिवसांपासून अस्थिर असलेल्या महाविकास आघाडी सरकारने अगदी काहीच दिवसात असंख्य जीआर मंजूर करुन घेतले. यावर राज्याच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेत राज्यपालांना यासंदर्भातील पत्र लिहीलं होतं. याची दखल राज्यपालांनी घेतली आहे.
राज्यपालांनी घाई-घाईनं मंजूर केलेल्या जीआरबाबत मुख्यमंत्री ठाकरेंना विचारणा केली आहे. २२ ते २४ जून या तीन दिवसांच्या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या सर्व जीआरची सविस्तर माहिती राज्यपालांनी मागवली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत राज्यपालांनी सूचना केल्या आहेत. आता मुख्य सचिव यावर काय माहिती देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
राज्यात सरकार अस्थिर झाल्याचा फायदा घेत सत्ताधाऱ्यांनी घाईघाईत असंख्य शासन निर्णय काढून कोट्यवधींचे जीआर मंजूर करुन घेतले आहेत. सरकारकडून ज्या घाईनं हे जीआर काढण्यात आले आहेत यात काहीतरी संशयास्पद आहे. त्यामुळे या कालावधी मंजूर केलेले जीआर तात्काळ रोखावेत असं विनंती पत्र प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पाठवलं होतं. परंतु राज्यपाल कोरोनाग्रस्त असल्यामुळे त्यावर कोणताही निर्णय झाला नव्हता. अखेर कोरोनावर मात करुन राजभवनात परतताच राज्यपाल कोश्यारी अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. २२ ते २४ जून २०२२ या कालावधी सरकारने जेवढे जीआर मंजूर केले त्याची संपूर्ण माहिती राज्यपालांनी मागवली आहे. या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या जीआरची चौकशी होणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे.