कुरघोड्या कायम! राज्यपालांनी फिरवला ठाकरे सरकारचा निर्णय; ‘त्या’ अधिकाऱ्याचे निलंबन रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 12:38 PM2022-03-17T12:38:18+5:302022-03-17T12:39:24+5:30
ठाकरे सरकारने घेतलेला एक निर्णय राज्यपालांनी आपला विशेषाधिकार वापरून रद्द केल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि महाविकास आघाडीचे ठाकरे (CM Uddhav Thackeray Govt) सरकार यांच्यातील वाद वाढताना दिसत आहे. अनेक मुद्द्यांवरून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्या मतभेद असून, दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता ठाकरे सरकारने घेतलेला एक निर्णय राज्यपालांनी आपला विशेषाधिकार वापरून रद्द केल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील आगीसंबंधी निष्काळजीपणाचा ठपका ठेवून तत्कालीन जिल्हा शल्य चकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना सरकारने निलंबित केले होते. राज्यपालांनी आपला विशेष अधिकार वापरून डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द केले आहे. त्यानंतर त्यांना नगरच्या शेजारीच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
१४ रुग्णांचा भाजून आणि होरपळून मृत्यू
जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबर २०२१ रोजी आग लागली होती. यामध्ये १४ रुग्णांचा भाजून आणि होरपळून मृत्यू झाला. हे प्रकरण राज्यभर गाजले. विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली. त्यानंतर सरकारने डॉ. पोखरणा यांच्यासह सहा जणांना निलंबित केले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केला. यामध्ये सुरुवातीला डॉ. पोखरणा सोडून इतर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अटक झाली. त्यावरून पुन्हा आंदोलने पेटली. प्रदीर्घ काळाने यासंदर्भातील अहवाल आला. त्यामध्ये डॉ. पोखरणा यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी अलीकडेच पोखरणा यांच्या अटकेचे सोपस्कार पार पाडून त्यांना तातडीने जामिनावर मुक्त केले. समितीचा संपूर्ण अहवाल मात्र अद्याप उघड करण्यात आलेला नाही.
दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७८ मधील नियम ४ च्या पोटनियम (५) खंड (क) यानुसार यासंबंधीचे अधिकार आहेत. त्यांचा वापर करून डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यानंतर राज्य सरकारचे कार्यासन अधिकारी वैभव कोष्टी यांच्या स्वाक्षरीने डॉ. पोखरणा यांच्या नव्या ठिकाणी नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला आहे.