Maharashtra Political Crisis: बहुमत चाचणी नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली नाही? राज्यपाल नेमू शकतात हंगामी अध्यक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 03:23 PM2022-06-29T15:23:00+5:302022-06-29T15:23:46+5:30
Maharashtra Political Crisis: ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार की नाही, यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
मुंबई: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आठवडाभरापासून राज्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. आठवडभरापासून वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अखेर या राजकीय नाट्यात उडी घेत थेट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणीचे पत्र दिले. यानंतर आता ३० जून रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. मात्र, आताच्या घडीला विधानसभेला अध्यक्ष नाही. अशा परिस्थिती उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली बहुमत चाचणी होऊ शकते, असे सांगितले जात आहे. मात्र, यातच राज्यपाल आपल्या विशेषाधिकारांचा वापर करून हंगामी अध्यक्ष नेमू शकतात, अशी शक्यता विधितज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती आहे. ही बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे बोलले जात असतानाच ज्येष्ठ विधिज्ञ जुगलकिशोर गिल्डा यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हंगामी अध्यक्षपदाची नेमणूक करू शकतात, असे म्हटले आहे.
हंगामी अध्यक्षांची नेमणूक करू शकतात
तत्पूर्वी, न्यायाधीश केहर यांच्या घटनापीठाने सभागृहाच्या विद्यमान अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना त्यांच्याऐवजी हंगामी अध्यक्ष यांनी बहुमत चाचणीसाठीच्या विधिमंडळ अधिवेशनाची कारवाई पाहावी, असे निर्णय दिले होते, याचा दाखला देताना, या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल बहुमत चाचणीच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्षांची नेमणूक करू शकतात. अशा वेळेस सभागृहातील सर्वात जास्त अनुभवी आमदाराची हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते, असे जुगलकिशोर गिल्डा यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
दरम्यान, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्यात येणार असून, ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याच अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रक्रियेसाठी हंगामी अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता फारच कमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.