उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात; राज्यपालांनी पाठवलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 08:58 PM2020-04-30T20:58:07+5:302020-04-30T22:33:36+5:30
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी येत्या २८ मेपर्यंत विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो.
मुंबई : राज्यात कोरोनाशी सामना सुरू असतानाच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा आणि पर्यायाने मुख्यमंत्रीपदाचाही पेच निर्माण झाला आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे बोलले जात असतानाच, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्यात यावी, अशी विनंती त्यांनी या पत्रात केली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा चेंडू आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला आहे.
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी येत्या २८ मेपर्यंत विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. कोरोनामुळे राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने हा राजकीय पेच निर्माण झाला आहे.
CoronaVirus News : आनंदाची बातमी; कोरोनाचा सामना करताना देशाला 'या' तीन पायऱ्यांवर मिळत आहे येश
महाराष्ट्र विधान परिषदेच्या या जागा गेल्या २४ एप्रिलपासून रिक्त आहेत. निवडणूक आयोगाने या जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घ्यावी आणि राज्यात निर्माण झालेला मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवावा, अशी विनंती राज्यपाल कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
आयोगाला लिहिलेल्या पत्रात कोश्यारी यांनी म्हटले आहे, की देशात लॉकडाउनच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्र सरकारने अनेक गोष्टी शिथील केल्या आहेत. काही गाइडलाइन्सप्रमाणे या रिक्त जागांसाठी निवडणूक होऊ शकते. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभेच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना २७ मे २०२० पूर्वी सभागृहात निवडून येणे आवश्यक आहे, असेही कोश्यारी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
CoronaVirus News : अमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात; आता परत लाखो डॉलर्सची करणार मदत
विधान परिषदेच्या या रिक्त जागांसाठी एप्रिल महिन्यातच निवडणूक होणार होती. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु असल्यामुळे ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलली होती. मात्र, ही निवडणूक घ्याण्यात यावी, यासाठी शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्यपाल यांना पत्र देण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २७ मे २०२० पूर्वी विधान परिषदेवर नियुक्त होणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गेल्या मंगळवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी कोरोनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्यपालांनी त्यांच्या कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर तातडीने कार्यवाही करावी, अशा विनंतीचे पत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना दिले आहे.
लवकरच 25000 लोकांसह रॅली करणार, लॉकडाउन उठवण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प ठाम