राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ७९ व्या वर्षी केला 'शिवनेरी' किल्ला सर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 11:31 AM2020-08-17T11:31:18+5:302020-08-17T11:36:18+5:30
छत्रपती शिवराय हे पूजनीय आदर्श: भगतसिंह कोश्यारी
जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराज हे खरे पूजनीय आदर्श आहेत. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. शिवराय सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व नव्हते तर ते अवतारी पुरुष होते. सद्यस्थितीत राम, कृष्ण, गुरू गोविंदसिंग, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यायला हवेत, असे झाल्यास देशाकडे कोणी तिरप्या नजरेने पाहणार नाही, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी रविवारी आले होते. हेलिकॉप्टरनेन येता वयाच्या ७९ वर्षी त्यांनी पायी चालत किल्ला सर केला. अशा प्रकारे पायी चढत शिवनेरीवर येणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. किल्ल्यावरून उतरताना देखील त्यांनी पायी उतरणे पसंत केले, यावेळी ते बोलत होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या समवेत आमदार अतुल बेनके, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पुरातत्त्व विभागाचे उपअधीक्षक डॉ. राजेंद्र यादव, उपवनसंरक्षक डॉ. जयरामे गौडा आदी उपस्थित होते. किल्ले शिवनेरीची गडदेवता शिवाई देवीस पूजा अभिषेक करत त्यांनी आरती करून त्यांनी दर्शन घेतले. गडावरील विविध वास्तूंची माहिती घेत असतानाच त्यांनी गडावरील विविध वृक्षांची माहिती घेतली. शिवकुंज स्मारकात राजमाता जिजाऊ आणि बालशिवबांच्या शिल्पापुढे राज्यपाल महोदय नतमस्तक झाले. शिवजन्मस्थळ इमारतीत त्यांनी शिवाजी महाराजांच्या पाळण्याचे तसेच शिवाजी महाराजांच्या शिल्पाचे पूजन केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते शिवकुंज परिसरात वृक्षारोपणदेखील करण्यात आले.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शिवनेरी किल्लेपर आकर अच्छा लगा. हम बहुत छोटे लोग है, हेलिकॉप्टरसे आते नही. शिवाजी महाराज इस किले पर पैदल आते थे, हम भी पैदल आहे है, ये पहाडी तो हमारे लिए कुछ भी नही है.
माझ्यासाठी पुण्याईचा क्षण
राज्याचे कोणीही मुख्यमंत्री किल्ले शिवनेरीवर पायी चालत आले नाहीत. त्यांनी पायी चालत यायला पाहिजे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राज्यपाल यांनी हा प्रश्न शेजारी असलेल्या आमदार अतुल बेनके यांना विचारा असे सांगितले. शिवनेरीवर कसे यावे, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. मी श्रद्धेपोटी पायी आलो असे ते म्हणाले. शिवनेरीवर येण्याचे नियोजन करताना तेथे पाऊस आहे. चिखल आहे, चढण आहे, असे सांगत घाबरवले होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या दृष्टीने पुण्याईचा क्षण आहे.