महाराष्ट्राचे राज्यपाल होणार मुख्यमंत्री? रमेश बैस छत्तीसगडला परत जाण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 08:16 AM2023-08-03T08:16:21+5:302023-08-03T08:16:53+5:30
छत्तीसगडशी त्यांची नाळ आजही किती पक्की आहे आणि त्यांची लोकप्रियता अजूनही कशी कायम आहे, याचा प्रत्यय त्यांच्या वाढदिवशी रायपूरमध्ये झालेल्या सत्काराच्या निमित्ताने आला. त्यांच्या सत्काराला चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे छत्तीसगडमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. छत्तीसगडशी त्यांची नाळ आजही किती पक्की आहे आणि त्यांची लोकप्रियता अजूनही कशी कायम आहे, याचा प्रत्यय त्यांच्या वाढदिवशी रायपूरमध्ये झालेल्या सत्काराच्या निमित्ताने आला. त्यांच्या सत्काराला चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
छत्तीसगडमध्ये येत्या नोव्हेंबरमध्ये होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला होता. डॉ. रमणसिंग यांच्या नेतृत्वात तीनवेळा सत्तेत आलेल्या भाजपला मोठा धक्का बसला होता. यावेळी पराभवाचा डाग पुसून भाजपला पुन्हा सत्ता आणायची असेल तर रमेश बैस यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा, अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. भाजप श्रेष्ठीही त्या दृष्टीने विचार करत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
आश्वासक चेहरा
- भाजपला विजयापर्यंत नेऊ शकेल, असा मोठा चेहरा आज छत्तीसगडमध्ये नाही. डॉ. रमण सिंग यांचा पूर्वीचा प्रभाव राहिलेला नाही. त्यामुळेच विविध राज्यांचे गेल्या काही वर्षांपासून राज्यपाल राहत आलेले रमेश बैस यांना परत आणण्याचा विचार सुरू झाला आहे.
- ओबीसी नेते असलेले सध्याचे काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना तेच आव्हान देऊ शकतील, असा तर्क त्यांच्या समर्थनार्थ दिला जात आहे.
- बघेल हे लोकप्रिय असले तरी काँग्रेसमधील एका वजनदार गटाचा त्यांना मोठा विरोध आहे. या विरोधाचा फायदा घेऊन भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याची क्षमता बैस यांच्यामध्येच आहे, असे म्हटले जाते.
...तरीही संधी मिळणार
नगरसेवक, आमदार, सातवेळा रायपूरचे खासदार, केंद्रीय मंत्री अशी बैस यांची यशस्वी राजकीय कारकीर्द राहिली आहे. भाजपमध्ये ७५ वर्षे वयावरील व्यक्तीला पद दिले जात नाही, असा नियम आहे. बैस यांनी वयाची पंचाहत्तरी गाठली असली तरी अपवाद म्हणून त्यांना संधी द्यावी, यासाठी छत्तीसगड भाजपमधूनच आग्रह सुरू झाला असल्याचेही सूत्रांनी सांगितले.