Maharashtra Political Crisis : "केंद्राच्या दबावामुळेच राज्यपाल निर्णय घेत आहेत", नाना पटोलेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 04:29 PM2022-06-29T16:29:10+5:302022-06-29T16:29:58+5:30
Maharashtra Political Crisis : राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला ) बहुमत चाचणीसाठी आदेश दिले आहेत. यावरून कॉंग्रेसचे नेते नाना पटोले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडी सरकारचा जोरदार सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले आहे. यात राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला ) बहुमत चाचणीसाठी आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आले असून भाजपच्या गोटातही मोठ्या हालचाली सुरु आहेत. यावरून कॉंग्रेसचे नेते नाना पटोले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्यपाल भाजपच्या अजेंड्यावर काम करत आहेत. आम्ही आज सुद्धा बहुमत चाचणीसाठी तयार आहोत. पण ही प्रक्रिया संविधानिक पद्धतीने पार पडली पाहिजे. केंद्राच्या दबावामुळेच राज्यपाल निर्णय घेत आहेत. विधानसभा कुस्तीचा आखाडा नाही. अजून १६ आमदारांबाबत प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपालांना एवढी कशाची घाई झाली आहे? केंद्र सरकारच्या दबावामुळे हे सुरु आहे. एवढी तत्परता विधानसभा अध्यक्षपद निवडणूक, १२ आमदारांच्या नियुक्तीत का नाही दाखवली, असा थेट सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे.
माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी राज्यपालांनी सांगितलं होते की, प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे आणि आता राज्यपाल बहुमत सिद्ध करायला सांगत आहेत. आमची काल पण तयारी होती आणि उद्याही बहुमत सिद्ध करण्याची तयारी आहे. पण राज्यपालाची भूमिका दुट्टपी आहे.आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. मला खात्री आहे की आम्हाला न्याय मिळेल, असेही नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले आहे. विधीमंडळातील बहुमत चाचणीच्या विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्याचे राजकारण आता निर्णायक स्थितीत आले आहे. शिवसेनेने राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयात आज (बुधवारी) संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे. शिवसेनेकडून वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे.