शासनकर्त्यांचा आरोपींना पाठिंबा - बाबा आढाव
By admin | Published: June 20, 2016 09:59 PM2016-06-20T21:59:47+5:302016-06-20T21:59:47+5:30
सध्या राज्यात असणा-या सरकारचा डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना पाठिंबा आहे, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २० - सध्या राज्यात असणा-या सरकारचा डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना पाठिंबा आहे, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी केला.
डॉ. दाभोळकर यांच्या हत्येला आज ३४ महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आज या हत्येचा निषेध करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. महर्षी शिंदे पूलावर दाभोळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मुक्ता दाभोळकर, अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख, आम आदमी पार्टीचे सुभाष वारे, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे शमसुद्दीन तांबोळी व अनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या या प्रकरणातील इतके आरोपी पकडले गेलेले असताना मुख्यमंत्री याबाबत एक शब्दही बोलायला तयार नाहीत. खडसे किंवा इतर बाबतीत मुख्यमंत्री बोलतात मात्र दाभोळकर यांच्या हत्येविषयी ते काहीच का बोलत नाहीत हा खरा प्रश्न आहे. मालेगाव बॉंबस्फोटासारखीच फसवणूक याबाबतही होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने आणि आत्मीयतेने पहाण्याची आवश्यकता आहे. अशा वातावरणात प्रबोधनाची चळवळ कशी चलवायची हा प्रश्न आहे. या आरोपींची पाळेमुळे ही गोवा, कर्नाटक याठिकाणी आहेत. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर लढण्याच्या गोष्टी सरकार करत असेल तर अंतर्गत असणाºया राष्ट्रीय प्रश्नाचे काय असा प्रश्नही बाबा आढाव यांनी उपस्थित केला.
यावेळी मुक्ता दाभोळकर म्हणाल्या, सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी. दाभोलकर यांच्या हत्येला ३४ महिने होऊनही तपासयंत्रणा अतिशय संथगतीने काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व प्रकरणातील साक्षीदारांना योग्य ते सरंक्षण देण्याची गरज असून या घटनेकडे पहाण्याचा सरकारचा दृष्टिकोन अतिशय चुकीचा आहे असेही त्या म्हणाल्या. या घटनेच्या मूळापर्यंत जाणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांविरोधी काम करणाºया लोकांना अशाप्रकारे आरोपी सापडत नसतील तर ही अतिशय अवघड गोष्ट आहे.
सुभाष वारे म्हणाले, न्यायालयाने सरकारी तपास यंत्रणेच्या कानाखाली आवाज काढल्यानंतर तपासाला वेग आला आहे. सरकारचा या प्रकरणाबाबत दुटप्पी भूमिका असल्याने येत्या काळात जनतेला दबाव निर्माण करावा लागेल. त्यामुळे सरकारने वेळीच योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आमचा विवेकी मार्गही येत्या काळात सरकारला महागात पडेल. सरकारने अजूनही गभीरपणे या प्रकरणाचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.
मालेगाव, मडगाव, ठाणे अशा विविध ठिकाणी बॉंबस्फोटाच्या घटना घडल्या तेव्हाच या संघटनेवर बंदी घातली असती तर आज दाभोळकर, कॉम्रेड पानसरे व कलबुर्गी यांच्यासारखी माणसे गमावण्याची वेळ आपल्यावर आली नसती त्यामुळे या संघटनेवर तत्काळ बंदी घालावी अशी मागणी राष्ट्र सेवा दलातर्फे याठिकाणी करण्यात आली.