गोविंद पानसरेंवर खुनी हल्ला
By admin | Published: February 17, 2015 02:46 AM2015-02-17T02:46:37+5:302015-02-17T02:46:37+5:30
गोविंद पंढरीनाथ पानसरे (८१) यांच्यावर सोमवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खुनी हल्ला केला.
महाराष्ट्र सुन्न : गोळीबारात पत्नीही जखमी
कोल्हापूर : पुरोगामी चळवळीतील अग्रणी नेते, श्रमिक, कष्टकरी व कामगारांचे पुढारी तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते अॅड. गोविंद पंढरीनाथ पानसरे (८१) यांच्यावर सोमवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खुनी हल्ला केला. या हल्ल्यात पानसरे यांच्या पत्नीसुद्धा जखमी झाल्या. दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. ही घटना पानसरे यांच्या निवासस्थानापासून सत्तर फुटांवर घडली. कॉ. पानसरे यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत या घटनेमागे कोणत्या प्रतिगामी शक्ती आहेत याचा तपास करण्यासाठी पोलिसांची दहा पथके तयार करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा अद्याप शोध लागला नसताना त्याच विचारांचे जाहीरपणे समर्थन करणारे व त्यांच्या चळवळीला बळ देणारे पुरोगामी नेते कॉ. पानसरे यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. कॉ. पानसरे व त्यांच्या पत्नी उमा (वय ६७) सकाळी नित्यनियमाप्रमाणे फिरायला बाहेर पडले. सकाळी ९.२० वाजता ते घराकडे परतत असतानाच दोघा हल्लेखोरांनी पानसरे यांच्यावर पिस्तूलमधून पाच गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी पानसरे यांच्या मानेला, दुसरी काखेत तर तिसरी त्यांच्या उजव्या पायाला लागली. या वेळी झालेल्या झटापटीत त्यांच्या पत्नी खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पानसरे पती-पत्नी रस्त्यावरच कोसळले. तोपर्यंत घरातून पानसरे यांच्या स्नुषा मेघा, नातू मल्हार व कबीर, तसेच त्यांचे एक नातेवाईक मुकुंद कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या पानसरे दाम्पत्यांना नजीकच्या अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
कॉ. पानसरे यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना तत्काळ रक्त चढविण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला तसेच त्यांच्या हृदयाचे स्पंदन तसेच नाडीचे ठोके कमी होत होते. तेही योग्य उपचारांनी नॉर्मल करण्यात यश मिळविले. त्यानंतर पानसरे पती-पत्नींवर एकाचवेळी तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. कॉ. पानसरे यांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे, अशी माहिती अॅस्टर आधार हॉस्पिटलचे डॉ. उल्हास दामले यांनी दिली. (प्रतिनिधी)
पाच जण ताब्यात
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दुपारी इचलकरंजीतून पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या मनीष नागोरीसह पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू असून, पोलिसांना अद्याप कोणतेही धागेदोरे मिळालेले नाहीत. नागोरीला यापूर्वी दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
हल्ल्याचे कारण ‘ते’ भाषण?
ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (दि. १४) पानसरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते म्हणाले, ज्यांच्यामुळे गांधीजींचा खून झाला त्याच विचारसरणीच्या लोकांनी त्यांचा जयजयकार सुरू केला आहे. नथुराम गोडसेला फाशी दिली तो दिवस ‘शौर्य दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे. पानसरेंच्या या भाषणाचा व आजच्या हल्ल्याचा संबंध आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
चळवळीतील नेत्यांवरील हल्ल्यांचा इतिहास
२० आॅगस्ट २०१३... अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर पुण्यात गोळ्या घालून खून करण्यात आला.
१३ जानेवारी २०१०... माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्यावर वार करून त्यांचा खून करण्यात आला.
१६ जानेवारी १९९७... कामगार चळवळीतील नेते दत्ता सामंत यांच्यावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून त्यांची जीवनयात्रा संपविली.
५ जून १९७०... कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आणि कामगार चळवळीतील नेते कृष्णा देसाई यांची मुंबईत हत्या.