साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर यांचे निधन

By Admin | Published: March 23, 2017 03:33 AM2017-03-23T03:33:58+5:302017-03-23T03:33:58+5:30

ज्येष्ठ पत्रकार, साक्षेपी संपादक आणि सामाजिक-राजकीय घडामोडींचे परखड भाष्यकार गोविंद तळवलकर यांचे मंगळवारी रात्री अमेरिकेत क्लीव्हलँड येथे राहत्या घरी निधन झाले.

Govind Talwalkar, wife of literary editor | साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर यांचे निधन

साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर यांचे निधन

googlenewsNext

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, साक्षेपी संपादक आणि सामाजिक-राजकीय घडामोडींचे परखड भाष्यकार गोविंद तळवलकर यांचे मंगळवारी रात्री अमेरिकेत क्लीव्हलँड येथे राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने पत्रकारितेमधील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व व दोन पिढ्यांचा विद्वान मार्गदर्शक हरपल्याची हळहळ व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि ‘लोकमत मीडिया’चे चेअरमन विजय दर्डा यांच्यासह अनेक मान्यवरांनी तळवलकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. तळवलकर यांच्या निधनाने पत्रकारितेचे मोठेच नुकसान झाले आहे, असे विजय दर्डा म्हणाले. त्यांच्या निधनाने अभ्यासू विश्लेषक संपादकाला महाराष्ट्र मुकला आहे, असे शरद पवार म्हणाले.
तळवलकर यांच्या पश्चात दोन कन्या आहेत. त्यांंचे वास्तव्य गेली अनेक वर्षे अमेरिकेत कन्यांकडे होते. बराच काळ तळवलकर वृद्धापकाळाशी निगडित व्याधींनी आजारी होते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शरीर थकले होते तरी तळवळकर यांच्या बुद्धीची कुशाग्रता व त्यांचा पत्रकाराचा पिंड शेवटपर्यंत कायम होता. अगदी अलीकडे म्हणजे गेल्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदी झालेल्या अनपेक्षित विजयाचे मार्मिक विश्लेषण करणारा तळवलकर यांचा प्रदीर्घ लेख प्रसिद्ध झाला होता. वयाची नव्वदी गाठल्यावरही तळवलकर यांनी जपान, रशिया अणि इंग्लंडमधील शासकीय अभिलेखांचा अभ्यास करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन विमान अपघातातच झाले होते, हे सप्रमाण जगापुढे मांडले होते.
डोंबिवलीत जन्मलेल्या तळवलकर यांनी १९४७ ते १९९६ अशी तब्बल पन्नास वर्षे निष्ठेने व विचारप्रवर्तक पत्रकारिता केली. त्यापैकी ‘दै महाराष्ट्र टाइम्स’च्या संपादकपदाचा तब्बल २७ वर्षांचा कालखंड विशेष उल्लेखनीय म्हणावा लागेल. त्यांचे लिखाण अत्यंत परखड, निर्भिड आणि अभिजात दर्जाचे होते. त्याला प्रचंड व्यासंग व समतोल विचाराची खोली असे. भाषेवरील प्रभुत्व व साधी, सोपी लेखनशैली यामुळे त्यांचे लिख़ाण विद्वत्तापूर्ण असूनही बोजड वाटत नसे. त्यांनी इंग्रजीतही खूप लिखाण केले आहे.
वृत्तपत्रीय लिखाणाखेरीज तळवलकर यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर मराठी आणि इंग्रजीतून विपूल लिखाण केले. त्यांची २५ प्रकाशित पुस्तके याची साक्ष देतात. त्यांच्यावर लोकमान्य टिळक आणि थोर मानवतावादी एम. एन. रॉय यांच्या लिखाणाचा प्रभाव होता. तळवलर यांच्या लेखनाच्या प्रभावाने किमान दोन पिढ्यांचे बौद्धिक पोषण झाले. अमेरिकेत गेल्यानंतर तळवलकर यांनी ‘लोकमत’साठीही प्रासंगिक विषयांवर अनेक वेळा लिखाण केले होते.
तळवलकर यांना असंख्य पुरस्कार व सन्मान मिळाले. त्यात उत्कृष्ठ पत्रकारितेसाठीचे ‘दुर्गा रतन’ व ‘रामनाथ गोएंका’ पुरस्कार, उत्कृष्ठ साहित्यकृतीसाठी न. चि. केळकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश होता.
(विशेष प्रतिनिधी)
---------------

Web Title: Govind Talwalkar, wife of literary editor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.