गोविंदा रे गोपाळा...!
By Admin | Published: August 26, 2016 02:11 AM2016-08-26T02:11:32+5:302016-08-26T02:11:32+5:30
पनवेल तालुक्यात दहीहंडी गोपाळकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पनवेल : पनवेल तालुक्यात दहीहंडी गोपाळकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. न्यायालयाच्या निर्बंधामुळे अनेक ठिकाणी दहीहंडी पथक फिरकलेच नाही. खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी आदी ठिकाणी राजकीय पक्षांनी दहीहंड्या उभारल्या होत्या. दहीहंडी पथकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मंडळांनी लाखो रुपयांचे बक्षीस ठेवले होते. उलवे नोडमध्ये देखील भाजपाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भूमिपुत्र भवनसमोरील मैदानात अनोख्या पद्धतीच्या व न्यायालयाच्या आदेशानुसार दहीहंडी उत्सव साजरा केला. दहीहंडी उत्सव २0१६ अशी ही स्पर्धा रंगली. दहीहंडीत चार थर लावणाऱ्या पथकास १0 हजार रोख व चषक, तर तीन थरावर सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला ५ हजार रुपये देण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे नगराध्यक्ष महेश बालदी, अरुणशेठ भगत आदी उपस्थित होते. तालुक्यातील ग्रामीण भागात देखील पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडण्यात आली. गावात दुपारी १२ वाजता या दहीहंडी फोडण्यास सुरु वात झाली. खारघर, कोपरा, टेभोंडे, वळवली आदी गावात मोठ्या उत्साहात दहीहंडी सण साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)
>पनवेल शहरातील बापट वाड्यातील दहीहंडी ही नेहमीच याठिकाणचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली असते. शहरात नवनाथ महाराजांचे अस्थान स्थापन केलेले आहे. या अस्थानाची पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करून बापट वाड्यात शहरातील मानाची दहीहंडी फोडली जाते. यावेळी शहरातील गोविंदा येऊन पारंपरिक पद्धतीच्या दहीहंडीत सहभागी होत असतात. यावेळी जमलेले गोविंदा एका विशेष भाषेत एकमेकांशी संवाद साधत असतात. त्यानंतर जमलेल्या गोविंदांना मोठ्या दोरखंडाने अंगावर फटके मारले जातात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. यंदाचे या दहीहंडीचे १५0 वे वर्ष होते.