गोविंदा सज्ज़, आज विक्रमगडमध्ये दहीहंडीची धूम
By admin | Published: August 25, 2016 03:20 AM2016-08-25T03:20:29+5:302016-08-25T03:20:29+5:30
विक्रमगड तालुका शहर व परिसरात दरवर्षी पारंपारिक पध्दतीने दहीकाला मोठया उत्साहात साजरा केला जातो़
राहुल वाडेकर,
विक्रमगड- विक्रमगड तालुका शहर व परिसरात दरवर्षी पारंपारिक पध्दतीने दहीकाला मोठया उत्साहात साजरा केला जातो़ कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी फोडण्यांत येणाऱ्या दहीहांडी साठी गेल्या काही दिवसांपासून गोविंदा पथके सतत सराव करीत आहेत़ गुरुवारी होणाऱ्या दहीकाल्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत़ मात्र दरवर्षी कृष्णजन्म आणि दहीहांडीच्या दिवशी जमके बरसणाऱ्या पावसाने दडीमारल्यामुळे गोविंदांमध्ये काहीसे निराशेचे वातावरण आहे़ कारण गोपाळकाला खेळण्यासाठी पाउस हा हवाच़ त्यात यंदा दहीहांडी खेळतांना दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे़
गुरुवारी साजऱ्या करण्यांत येणाऱ्या दहीकाला उत्सवात विक्रमगड तालुका,विक्रमगड शहर व परिसरातील अनेक गोविंदा पथके सहभागी होत आहेत़ ही पथके विक्रमगड शहरातील गेल्या अनेक वर्षापासून सन्मित्र मंडळाच्या मार्गदर्शखाली सहभागी होत आहेत़ शहराच्या संख्येने ग्रामीण भागात एखादे दुसरेच गोविंदा पथकांची संख्या आहे़ यंदा हा दहीकाला उत्सवालाही महागाईची झळ बसलेली आहे़ दहीहांडीसाठी लागणारी हंडी पूर्वी ५० रुपयांपासून मिळत होती आता त्यांचे दर वाढलेले आहेत़ तर फळांच्या-फुलांच्या किंमतही भरमसाट अशी दुपटीने वाढ झाली आहे़ श्रावण महिना असल्याने महिनाभर असे अनेक सण उत्सव येत असतात व हा उपवासाचा महिना असल्याने फळे व फुलांची मागणी वाढलेली आहे़ तरीही दहीहंडी उत्सव मंडळांच्या उत्साह वाखाणण्याजोगा आहे़
मोठी बक्षिसे नाहीत, ग्लॅमर नाही, पण उत्सव होतो जल्लोषात
विक्रमगड हा तालुका ग्रामीण भागात मोडला जातो परंतु ग्रामीण भागासह विक्रमगड शहरातही आजही त्याच जुन्या रुढी-परंपरा जोपसल्या जात आहेत़ आजही तेवढयाच भक्ती भावाने सण, उत्सव एकत्ररित्या साजरे केले जात आहेत़ विक्रमगड व परिसरात साऱ्या तालुक्यात जवळजवळ १०० ते १५० मंडळे आपल्यागाव-खेडया पाडयात व शहरात बांधलेल्या हंडया फोडून मोठ्या जल्लोषात हा सण साजरा करीत असतात़ ग्रामीण भाग असल्याने येथील उत्सवात मोठी बक्षिसे नसली तरी सर्वांनी एकोप्याने दहीहांडी बांधायची व सर्वाना ती फोडण्याचा चान्स देऊन आनंदाने पारंपारिक पध्दतीनेच हा उत्सव आजही साजरा होतो आहे़
>तालुक्यात विविध भागात विविध क्षेत्रात जवळ जवळ २०० ते ३०० हंडया बांधल्या जातात़ या भागात जास्तीत जास्त तिन ते चार थरापर्यतच हंडयांची उंची असून सुरक्षिततेच्या कारणास्तव उंच हंडयांचे थर बांधले जात नाही़
यावेळी डीजेची मोठी मागणी असते. डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई आज ग्रामीण भागात ही पहावयास मिळत आहे़ ग्रामीण भागातील गोंिवंदा मंडळे दुसऱ्या गावातील दहीहांडया फोडण्यासाठी न जाता आपापल्याच गावात हा उत्सव साजरा करतात़
पूर्वी विक्रमगड शहरात साऱ्या गाव-पाडयांतील जनता दहीहांडी पाहाण्यासाठी येत होती मात्र आता सर्वच ठिकाणी उत्सव साजरा करत असल्यानेशहरातील गर्दी ओसरु लागली आहे़ काही दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने उदया अशीच परिस्थित राहाण्याची शक्यता असल्याने या दिवशी घराघरातून गोविंदांवर पाण्याचा वर्षाव केंला जातो.