गोविंदा पथकांनी न्यायालय आणि पोलिसांचे आदेश केले भंग

By admin | Published: August 26, 2016 06:54 AM2016-08-26T06:54:31+5:302016-08-26T06:54:38+5:30

गोकुळष्टमीच्या मुहूर्तावर दहीहंडीचे उंचच उंच थर लावत, आयोजक आणि गोविंदा पथकांनी न्यायालय आणि पोलिसांचे आदेश अक्षरश: पायदळी तुडविले.

Govinda Squad ordered court and police to dissolve | गोविंदा पथकांनी न्यायालय आणि पोलिसांचे आदेश केले भंग

गोविंदा पथकांनी न्यायालय आणि पोलिसांचे आदेश केले भंग

Next
>मुंबई/ठाणे : सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेले निर्बंध धाब्यावर बसवत गोकुळष्टमीच्या मुहूर्तावर दहीहंडीचे उंचच उंच थर लावत, आयोजक आणि गोविंदा पथकांनी न्यायालय आणि पोलिसांचे आदेश अक्षरश: पायदळी तुडविले. ठाण्यात दहीहंडी उत्सवात नऊ थर लावण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आयोजकांनी पोलिसांच्या साक्षीने पूर्णत्वास नेला. न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल आता आयोजक, गोविंदा पथके इतकेच नव्हे, तर प्रोत्साहन देण्याकरिता हजर असलेल्या सेलिब्रिटींवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. दहीहंडीच्या थरारात दिवसभरात २१८ गोविंदा जखमी झाले, तर १९ पथकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीच्या मानवी मनोऱ्यांना २० फुटांची मर्यादा आखून दिली होती, तसेच १८ वर्षांखालील गोविंदांना बंदी केली होती. मात्र, या मर्यादेचे सर्रास उल्लंघन करत, मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांनी मनोऱ्यांचे नऊ थर लावून आणि चिमुकल्या गोविंदांना थरावर चढवून न्यायालयाला एक प्रकारे आव्हानच दिले. काही मंडळांनी व गोविंदा पथकांनी काळे झेंडे फडकावून न्यायालयाच्या आदेशाचा निषेधही नोंदविला. हे सर्व प्रकार पोलिसांच्या समक्ष घडत असतानाही त्यांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही, ना आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर जागेवर गुन्हे दाखल केले.
गुन्हे दाखल झाले, तरी बेहत्तर नऊ थर लावणारच, अशी भूमिका घेणाऱ्या ठाणे मनसेने भगवती मैदानात दहीहंडी उभारली होती. मनसेच्या दहीहंडीत पोलिसांनी रंगमंचावर येऊन आयोजकांना समज दिली असतानाही, जोगेश्वरीच्या ‘जय जवान’ गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी दिली. त्यानंतर, हंडी खाली घेऊन चार थर लावून ती फोडण्यात आली. 
यंदा मुंबई शहर-उपनगरात मोठ्या आयोजकांच्या हंड्या कमी असल्याने गोविंदा पथकांनी गल्लोगल्ल्यांत जाऊन हंड्या फोडल्या. दादरमध्ये जय हनुमान या जुन्या दहीहंडी पथकाने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जमिनीवर झोपून आडवे नऊ थर लावले, तर विवेकानंद युथ कनेक्ट या गोविंदा पथकाने महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यासमोर चार थरांची सलामी दिली. (प्रतिनिधी)
>जुजबी कैद व किरकोळ दंड! 
गुरुवारच्या दहीहंडी उत्सवात २० फुटांहून अधिक 
उंचीचे थर लावून आणि १८ वर्षांहून कमी वयाच्या 
मुलांना मानवी मनोऱ्यावर चढवून, ज्या आयोजकांनी व दहीहंडी मंडळांनी सर्वोच्च न्यायालायच्या आदेशाचा भंग केला, त्यांना जेव्हा केव्हा गुन्हा सिद्ध होईल, तेव्हा फार तर सहा महिन्यांची कैद अथवा आणि एक हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.
>थर उल्लंघन आणि बालगोविंदाही
बोरीवली येथे प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी आयोजनात नियम मोडल्याचे दिसून आले. चेंबूरमध्ये मनसेचे पदाधिकारी कर्ण दुनबळे यांच्या दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकाने आठ थर रचून नियमांचे उल्लंघन केले. जोगेश्वरी परिसरात साईराम गोविंदा पथकाने डोळ्यावर काळी पट्टी बांधून चार थरांची सलामी दिली, तर गोरेगावच्या गावदेवी महिला गोविंदा पथकाचीही पाच थरांची हंडी फोडत उंची आणि १८ वर्षांखालील गोविंदाच्या सहभागाचे नियम धाब्यावर बसविले. 
>अभिनेता भाऊ कदम अडचणीत?
न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल आयोजक, 
गोविंदा पथक व प्रोत्साहन द्यायला आलेले सेलिब्रिटी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाण्यात मनसेच्या दहीहंडीच्या ठिकाणी उपस्थित असलेले अभिनेते भाऊ कदम यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. कदम यांच्याबरोबर व्यासपीठावर राजू पाटील, अमेय खोपकर, अविनाश जाधव, अभिजित पानसे हेही हजर होते. 
>न्यायालयाच्या नियमांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केलेले नाही. आम्ही केवळ नऊ थरांच्या हंडीच्या बाजूला सलामी दिली, परंतु सहा थरांवर हंडी फोडली असून, त्यामध्ये १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या तरुणांचा समावेश होता. 
- प्रदीप मिश्रा, 
जय जवान गोविंदा पथक
>न्यायालयाच्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याने आयोजकांसह गोविंदा पथकांना प्रोत्साहित करणाऱ्यांवर आणि मंडळांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता व्हिडीओ शूटिंग पाहून पुढील कारवाई केली जाईल. 
- भरत शेळके, सहायक पोलीस आयुक्त, ठाणे
>आम्ही कायदा मोडला आहे. हिंदूंच्या प्रत्येक सणावर बंधने कशाला हवीत. त्याचाच निषेध म्हणून मनसेने या पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आम्ही नऊ थर लावलेच. 
- अविनाश जाधव, ठाणे शहर मनसे अध्यक्ष
>बालगोविंदा कोमात
उल्हासनगरमधील लालचक्की येथील शिवसेनेच्या दहीहंडीत सहाव्या थरावरून पडून सुजल गडपकार (१२) हा बालगोविंदा गंभीर जखमी झाला आहे. राधेश्याम गोविंदा पथकातील या गोविंदावर कल्याणमधील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुजलच्या डोक्याला आणि छातीला मार लागल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. सध्या तो कोमात असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.

Web Title: Govinda Squad ordered court and police to dissolve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.