आज गोविंदाचा थरथराट!
By admin | Published: September 6, 2015 05:12 AM2015-09-06T05:12:08+5:302015-09-06T05:12:08+5:30
गुरुपौर्णिमेपासून सुरू झालेला दहीहंडीचा सराव अखेर रविवारी सार्थकी लागणार आहे. न्यायालय, शासन, पोलीस अशा यंत्रणांच्या कचाट्यात सापडलेला उत्सव धामधुमीत साजरा करण्यासाठी
मुंबई : गुरुपौर्णिमेपासून सुरू झालेला दहीहंडीचा सराव अखेर रविवारी सार्थकी लागणार आहे. न्यायालय, शासन, पोलीस अशा यंत्रणांच्या कचाट्यात सापडलेला उत्सव धामधुमीत साजरा करण्यासाठी शहर-उपनगरातील गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. सकाळपासून मुंबई शहर-उपनगरात दहीहंडी उत्सवाची धामधूम दिसून आली. वादानंतरही पथकांमधील तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
गोविंदा पथकांची पहाटेपासून रात्रीपर्यंत किती दहीहंड्या फोडायच्या, कुठे भेट द्यायची, कुठे केवळ थर उभारून सलामी द्यायची, याची तयारी पूर्ण झाली आहे. काही लहान गोविंदा पथकांना स्पॉन्सर्स न मिळाल्याने काहीशी नाराजी असली तरी स्वत:च्या खिशातून पदरमोड केल्याने उत्सव साजरा करण्याचा वेगळा आनंद पथकातील तरुणाईत दिसून येतो आहे.
मुंबईच्या गिरणगावातील गल्लोगल्ली श्रीकृष्णजन्माचे सोहळे साजरे झाले. शिवाय, बऱ्याच ठिकाणी रात्री उशिरा गोविंदा पथकांनी मानाच्या हंड्याही फोडल्या. एकंदर, उत्सवाच्या वादानंतर बड्या आयोजकांच्या पाठिंब्याशिवाय यंदा उत्सव कसा साजरा होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.