गोविंदा आला रे.... राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह
By admin | Published: September 6, 2015 12:34 PM2015-09-06T12:34:07+5:302015-09-06T17:31:30+5:30
गोविंदा आला रे असं म्हणत थरारवर थर रचणारी पथकं, डिजेच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात मुंबईसह राज्यभरात दहीहंडी साजरी केली जात आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - गोविंदा आला रे असं म्हणत थरारवर थर रचणारी पथकं, डिजेच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात मुंबईसह राज्यभरात दहीहंडी साजरी केली जात आहे. बहुतांशी ठिकाणी नियम धाब्यावर बसवून दहीहंडी साजरी केली जात असून दहीहंडीनिमित्त राज्यात सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
२० फुटांपेक्षा जास्त उंचीवर दहीहंडी बांधू नये, दहीहंडीच्या ठिकाणी गाद्या ठेवणे, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट आदी सुरक्षा उपाययोजना करणे, १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडी फोडण्यास मनाई असे महत्त्वाचे नियम न्यायालयाने दहीहंडी आयोजक व गोविंदा पथकांना आखून दिले आहेत. रविवारी सकाळपासून मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह दिसत असून दुपारनंतर हा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दादरमधील आयडियल येथील दहीहंडी जय हनुमान गोविंदा पथकाने फोडली आहे. या ठिकाणी थर कोसळल्याने एक गोविंदा जखमी झाल्याचे समजते. या पथकाने २० फुटांपेक्षा जास्त उंचीचा थर लावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, ब-याच ठिकाणी न्यायालयाचे धाब्यावर बसवून दहीहंडी साजरी होताना दिसत आहे. दुचाकीवर ट्रिपल सीट जाणा-या गोविंदावर कारवाई करु असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. मात्र दादर परिसरात ब-याच ठिकाणी गोविंदांनी हा नियमही धाब्यावर बसवला आहे. मुंबईत यंदा ३,४७० दहीहंडी बांधण्यात आली असून यापैकी ८०० हंड्या या बड्या आयोजकाच्या आहेत.
आत्तापर्यंत ३२ गोविंदा जखमी
दहीहंडी फोडण्यासाठी थर रचत असताना आत्तापर्यंत ३२ गोविंदा जखमी झाले आहे. यातील केईएम रुग्णालयात २२ तर शीव रुग्णालयात २ गोविंदावर उपचार करण्यात आले. तर अन्य गोविदांवर मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.