गोविंंदा विल, गेट वेल सून!
By admin | Published: November 3, 2016 03:06 AM2016-11-03T03:06:01+5:302016-11-03T03:06:01+5:30
तीन वर्षे अंथरुणात खितपत पडलेल्या नालासोपाऱ्यातील जखमी गोविंदाच्या प्रकृतीत १० टक्क्याहून अधिक सुधारणा झाली आहे
शशी करपे,
वसई- दहीहंडीचा सराव करताना जखमी होऊन गेली तीन वर्षे अंथरुणात खितपत पडलेल्या नालासोपाऱ्यातील जखमी गोविंदाच्या प्रकृतीत १० टक्क्याहून अधिक सुधारणा झाली आहे. पुढील वर्षीच्या गोविंंदापर्यंत हा गोविंंदा स्वत:च्या पायावर उभा राहू शकेल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
नालासोपाऱ्यातील कै.रमाकांत वैद्य चॅरिटेबल ट्रस्टने दहिहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांवर उपचार करण्याचा उपक्रम यंदापासून हाती घेतला आहे. ही माहिती सोशल मिडीयातून पसरल्यानंतर नालासोपारा पश्चिमेकडील महात्मा फुुले नगरातील झोपडीत अंथरुणाला खिळलेल्या प्रवीण रहाटेची माहिती वैद्य ट्रस्टचे अध्यक्ष अमित यांना मिळाली. त्यांनी प्रवीणवर उपचार सुरु केले. नालासोपाऱ्यातील शिव गणेश दहिहंडी मंडळाचा प्रवीण मजबूत पाया होता. आठ थर लावणारे हे तालुक्यातील पहिले पथक होते. सराव करतांना वरील थर प्रवीणच्या अंगावर कोसळले. त्यात प्रवीणच्या कणा मोडला. २०१३ साली घडलेल्या या अपघाताने शिव गणेश मित्र मंडळ हादरुन गेले. या मंडळाने दहिहंडीच्या कमाईतून जमा केलेला सर्व निधी प्रवीणच्या उपचारावर खर्च केला. लीलावती हॉस्पीटलमध्ये उपचार केल्यानंतरही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे मंडळाने हार मानली तरी प्रवीणने आपला संघर्ष सुरुच ठेवला. प्रवीण पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहण्याची शक्यता नसतांनाही अंगात जोर आहे तोपर्यंत प्रवीणला काही कमी पडू द्यायचे नाही. या जिद्दीने सुलोचनाबाई अंग मोडेपर्यंत राबताहेत. त्यातच वैद्य ट्रस्टने त्यांना मोठा दिलासा दिला. प्रवीणला पुन्हा उभा करु अशी त्यांनी शाश्वती मावशीला दिली. त्यानंतर वैद्य यांनी प्रवीणवर उपचार केलेल्या लिलावती हॉस्पीटलचे डॉक्टर कोहलींची भेट घेवून पुढील उपचाराबाबात त्यांचे मार्गदर्शन घेतले. सध्या विजय वल्लभ हॉस्पीटल, डॉ.सागर मांगेला यांच्या सहकार्याने प्रवीणवर उपचारही सुरु आहेत.फिजीओथेरेपीस्ट डॉ.श्रद्धा पारेख उपचार करीत आहेत. यामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणाही झाली आहे. त्याच्या कमरेला बळ मिळाले असून गुडघ्यांमध्येही ताकद आली आहे. त्याची इच्छाशक्ती जबर असल्यामुळे सुधारणा होऊ लागली आहे. २०१७ च्या दहिहंडी उत्सवापूर्वी प्रवीण स्वत:च्या पायावर उभा राहून उत्सव पहायला नक्की येईल.
>‘माय मरो पण मावशी...
पावभाजीचा व्यवसाय करणाऱ्या प्रवीणच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला होता. बालपणीच आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या प्रवीणचा त्याची मावशी सुलोचना वाळींजकर यांनी लहानपणापासून सांभाळ केला होता.
‘माय मरो पण मावशी जगो’ या प्रमाणे सुलोचना मावशीने प्रवीणला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. तो अंथरुणाला खिळल्यानंतर तर त्यांनी नोकरीही केली. सकाळी प्रवीणची तयारी केल्यानंतर त्याच्यासाठी जेवण तयार करून कामाला जाणे हा त्यांचा परिपाठ होता.