गोविंदा हवा; सेलिब्रिटी नको
By admin | Published: July 9, 2017 12:03 AM2017-07-09T00:03:32+5:302017-07-09T00:03:32+5:30
दहीहंडी उत्सवात जिवावर उदार होऊन, आपले कौशल्य दाखविणाऱ्या गोविंदांपेक्षा, आयोजकांकडून सेलिब्रिटींना अधिक महत्त्व दिले जाते. परिणामी, जखमी गोविंदांपेक्षा
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहीहंडी उत्सवात जिवावर उदार होऊन, आपले कौशल्य दाखविणाऱ्या गोविंदांपेक्षा, आयोजकांकडून सेलिब्रिटींना अधिक महत्त्व दिले जाते. परिणामी, जखमी गोविंदांपेक्षा कलाकार, गायकांच्या सुरक्षेसाठी तत्परता दाखविणाऱ्या आयोजकांना या वेळी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण अशा आयोजकांच्या दहीहंडीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीने दिला आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे शनिवारी समितीने ‘दहीहंडीचे आयोजन आणि आयोजक’ या विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर या वेळी म्हणाले की, गोविंदासाठीची वयोमर्यादा व २० फुटांहून अधिक उंचीचे मानवी थर उभारण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा. दहीहंडी आता सण उरला नसून, काही आयोजकांनी या सणाला इव्हेंटचे स्वरूप दिले आहे. उत्सवात गोविंदाऐवजी सेलेब्रिटींना महत्त्व दिले जाते. गोविंदाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचबरोबर, या वेळी दहीहंडी पाहायला येणारे प्रेक्षक आयोजकांनी आयोजित केलेल्या बाजारू स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी गर्दी करतात. त्यामुळे दहीहंडी बांधलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीमुळे गोविंदांना पुरेशी जागा मिळत नाही. त्यांना दहीहंडी फोडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत अनेकदा गोविंदांची भंबेरी उडते. मनोरा रचताना गोविंदा गोंधळतात व खाली पडून जखमी होतात. त्यामुळे अशा आयोजकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा समितीने दिला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. समन्वय समितीच्या इशाऱ्यामुळे उत्सवात नेमके काय होणार, याची उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील गोविंदांच्या या विषयाचे समर्थन केले आहे. शिवाय अशा आयोजकांकडे हंडी फोडण्यासाठी जाऊ नये, असेही आवाहन राज यांनी केले आहे, असे पडेलकर यांनी सांगितले. या प्रसंगी समन्वय समितीचे उपाध्यक्ष सुरेंद्र पांचाळ, कार्याध्यक्ष अरुण पाटील व सचिव गीता झगडे उपस्थित होते.
मंडळे दिवाळखोर
गेल्या तीन-चार वर्षांमध्ये दहीहंडी आयोजकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. अनेक ठिकाणी दहीहंडीची रक्कम कमी करण्यात आली आहे. आयोजक उत्सवापेक्षा सेलेब्रिटींना जास्त महत्त्व देत असल्यामुळे, गोविंदांना एका दिवसात जास्त दहीहंड्या फोडता येत नाहीत. त्यामुळे अनेक मंडळे दिवाळखोर झाली आहेत.
महिला गोविंदासोबत गैरवर्तणूक नको
दहीहंडीदरम्यान मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र, अशा कार्यक्रमांचा दर्जा सुमार असतो. येथील प्रेक्षकही सुमार असतात. येथील प्रेक्षकांकडून महिला गोविंदाबाबत शेरेबाजीकेली जाते, असेही समितीने सांगितले.
संस्कृती प्रतिबिंबित करा
दहीहंडीच्या वेळी महाराष्ट्राची संस्कृती प्रतिबिंबित करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन आयोजकांनी करावे, अशी सूचनाही समितीने केली. कार्यक्रमात डीजे नसावा, असेही समितीने सांगितले.
गोविंदाच सेलिब्रिटी : दहीहंडी हा उत्सव गोविंदांचा असला, तरी दहीहंडीच्या कार्यक्रमात आयोजक भाड्याने अनेक सेलिब्रिटी आणतात. त्यामुळे आयोजक आणि प्रेक्षकांकडून उत्सव मूर्ती असलेल्या गोविंदांकडे, त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होते, परंतु या उत्सवाच्या दिवशी गोविंदाच खरा सेलिब्रिटी असल्यामुळे, त्याला सेलेब्रिटीसारखी वागणूक मिळायला हवी, अशीही आशा समितीने व्यक्त केली.
आज सरावाला सुरुवात
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत, मुंबई शहर आणि उपनगरातील गोविंदा पथकाकडून रविवारपासून सरावाचा श्रीगणेशा केला जाईल. सुमारे दोनशे मंडळे गुरुपौर्णिमेचे निमित्त साधत, सरावाला आरंभ करतात. हा सराव महिनाभर चालतो, असे समितीने सांगितले.