गोविंदा अडचणीत
By admin | Published: March 3, 2017 05:53 AM2017-03-03T05:53:20+5:302017-03-03T05:53:20+5:30
वीस वर्षांपूर्वी केलेल्या ‘छोटे सरकार’ या चित्रपटामुळे सिनेअभिनेता गोविंदा चांगलाच अडचणीत आला आहे
मुंबई : वीस वर्षांपूर्वी केलेल्या ‘छोटे सरकार’ या चित्रपटामुळे सिनेअभिनेता गोविंदा चांगलाच अडचणीत आला आहे. या चित्रपटातील एका गाण्यामुळे समाजाची बदनामी केल्यासंदर्भात त्याच्यावर झारखंडमध्ये १९९६मध्येच गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र त्याला काही दिवसांपूर्वी तेथील दंडाधिकाऱ्यांनी ‘फरारी’ म्हणून घोषित केले.
त्यामुळे गोविंदाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याच्या याचिकेवर शुक्रवारी उच्च न्यायालय निकाल देणार आहे.
या केसमध्ये गोविंदासह, आनंद-मिलिंद (गीतकार), अलका याज्ञिक (गायिका) आणि उदित नारायण यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
गोविंदाने केलेल्या याचिकेनुसार, तो गीतकार किंवा गायक नसून त्याने केवळ त्या गाण्यावर नृत्य केले आहे. कोणत्याही समाजाला बदनाम करण्याचा हेतू नव्हता.
‘पाकुरच्या मुख्य दंडाधिकाऱ्यांनी आपल्याला फरारी घोषित केल्यामुळे पोलीस अटक करण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात एक चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्याच्या प्रमोशनसाठी झारखंडला जावे लागेल. त्यामुळे तेथील पोलीस आपल्याला अटक करतील. या अटकेपासून तात्पुरता दिलासा देण्यात यावा,’ अशी मागणी गोविंदाने याचिकेद्वारे केली आहे.
‘अर्जदार (गोविंदा) समाजात वावरत आहे. त्या चित्रपटानंतरही अनेक चित्रपटांत काम केले आहे, असे असतानाही दंडाधिकाऱ्यांनी अर्जदाराला फरारी म्हणून घोषित केले,’ असा युक्तिवाद गोविंदाच्या वकिलांनी न्या. साधना जाधव यांच्यासमोर केला.
न्या. जाधव यांनीही त्यांच्या या युक्तिवादाशी सहमती दर्शवली. मात्र १९९६ला गुन्हा नोंदवूनही एवढ्या उशिरा गोविंदाने उच्च न्यायालयात धाव का घेतली, असा प्रश्न न्या. जाधव यांनी केला. त्यावर गोविंदाच्या वकिलांनी एवढी वर्षे याबद्दल काहीही माहीत नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. मात्र उच्च न्यायालयाने हे मान्य करण्यास नकार देत गोविंदाच्या याचिकेवरील निकाल शुक्रवारी देऊ, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
>झारखंडमधील पाकुरमध्ये गुन्हा दाखल
‘छोटे सरकार’मधील ‘एक चुम्मा तु मुझको उधार देदे और बदले मे यू.पी. बिहार लेले...’ या गाण्यामुळे यू.पी. व बिहारच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत झारखंड राज्यातील पाकुर येथे गोविंदावर गुन्हा नोंदविण्यात आला. काही दिवसांपूर्वी त्याला या केसमध्ये फरारी आरोपी म्हणून घोषित करण्यात आले. या केसमध्ये गोविंदासह, गीतकार, गायक, गायिका यांनाही आरोपी करण्यात आले आहे.