गोविंदांचा सविनय कायदेभंग
By admin | Published: August 26, 2016 04:33 AM2016-08-26T04:33:27+5:302016-08-26T04:33:27+5:30
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे ‘मनोरे’ शहर व उपनगरातील बहुतांश मोठ्या दहीहंडी आयोजक व मंडळांनी पोलिसांच्या साक्षीने कोसळविले.
मुंबई : दहीहंडीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे ‘मनोरे’ शहर व उपनगरातील बहुतांश मोठ्या दहीहंडी आयोजक व मंडळांनी पोलिसांच्या साक्षीने कोसळविले. वीस फुटापर्यंत मनोरे उभारण्याचे व १८ वर्षांखालील मुलांना सहभागी न करण्याच्या अटीचे सर्रासपणे उल्लंघन झाले. अनेकांनी पाच ते आठ थर उभे करताना त्यात लहान मुलांनाही सहभागी करुन घेतले होते.
मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई केली नसलीतरी त्याचे व्हिडीओ चित्रण करुन घेतले आहे. त्याची पडताळणी करुन येत्या काही दिवसांत त्याबाबत गुन्हे दाखल केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, चेंबूरमध्ये गोविंदा मंडळांने आठ थर लावून सलामी दिल्याने त्यांना पुन्हा तितके थर लावण्यास पोलिसांनी अटकाव केला. त्यामुळे काहीवेळ पोलीस व कार्यकर्त्यांत तणाव निर्माण झाला होता.
काही मंडळांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले असलेतरी अनेकांनी त्याचा सन्मान करीत दहीहंडी उत्साहात साजरी केली. पोलिसांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. ‘मनसे’सह काही मंडळांच्या आयोजकांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार नसल्याची जाहीर भूमिका घेतल्याने पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी सर्व दहीहंडी मंडळाचे व्हिडीओ चित्रण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शहर व उपनगरातील ३ हजार ३८७ मंडळांच्या दहीहंडी फोडण्याच्या घटनेचे चित्रण करण्यात आले.
ज्याठिकाणी कॅमेरे नव्हते, त्याठिकाणी पोलिसांनी मोबाईलमध्ये शूटिंग केले. त्याची पडताळणी करुन कोणत्या कलमानुसार कारवाई करायची, याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांचे प्रवक्ते उपायुक्त अशोक दुधे यांनी
सांगितले. या सोहळ्यामध्ये कसलेही विघ्न येवू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सकाळी आठ वाजल्यापासून पोलीस रस्त्यावर तैनात होते. (प्रतिनिधी)
>नवी मुंबईत उत्सव घटला
नवी मुंबई परीमंडळ एक परिसरात ४० दहीहंडी तर परीमंडळ दोन परिसरात १४० दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल तालुक्यात उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. न्यायालयाच्या निर्बधामुळे अनेक ठिकाणी दहीहंडी पथक फिरकलेच नाही. खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी आदी ठिकाणी राजकीय पक्षांनी दहीहंडया उभारल्या होत्या.