सत्ताधारी अन् विरोधकांनी समाजाच्या जिवाशी खेळू नये, पश्चात्ताप होईल; मनोज जरांगे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 05:25 AM2024-07-29T05:25:39+5:302024-07-29T05:26:34+5:30
२९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील आंदोलनाचा प्लॅन आणि उमेदवार उभे करायचे अथवा पाडायचे याचा निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : सत्ताधारी आणि विरोधकांनी समाजाच्या जिवाशी खेळू नये, अन्यथा खूप नुकसान होईल आणि पश्चात्ताप करायलाही वेळ मिळणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी सरकारला दिला.
पाच दिवसांच्या उपोषणामुळे प्रकृती ढासळल्याने जरांगे हे शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. रविवारी सकाळी त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेत अंतरवाली सराटीला मुक्काम हलविला.
ते म्हणाले की, मराठा आरक्षण हा मुद्दा सरकार आणि विरोधक हे एकमेकांकडे ढकलत आहेत. त्यांनी आता मराठा समाजाच्या जिवाशी खेळू नये, समाजाची ताकद मोठी असते.
मुंबईत बसूनही मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करता येतो. येथे येता कशाला, तुम्हाला मराठा समाजाचा आक्रोश, संतापाची लाट दिसत नाही का, असा सवालही त्यांनी केला. परिस्थिती आटोक्यात ठेवायची असेल तर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करणे हाच पर्याय असल्याचे ते म्हणाले.
२९ ऑगस्ट रोजी बैठक
७ ते १४ ऑगस्टदरम्यान महासंवाद यात्रा, २० ते २७ ऑगस्टदरम्यान सकल मराठा समाजातील प्रमुख नेत्यांशी चर्चा आणि २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील आंदोलनाचा प्लॅन आणि उमेदवार उभे करायचे अथवा पाडायचे याचा निर्णय घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.