संघावर सरकार मेहरबान!
By admin | Published: November 4, 2015 03:24 AM2015-11-04T03:24:40+5:302015-11-04T03:24:40+5:30
नागपूर महापालिका क्षेत्रातील रेशीमबाग क्रीडा मैदानाचा एक भाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देण्याचा निर्णय मुंबईत मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही संघाचीच
मुंबई : नागपूर महापालिका क्षेत्रातील रेशीमबाग क्रीडा मैदानाचा एक भाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देण्याचा निर्णय मुंबईत मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही संघाचीच जमीन आहे; परंतु ती आरक्षणात दर्शविण्यात आली होती. तसेच अकोला शहरातील मलकापूर क्रीडा मैदानाला ‘सार्वजनिक वापराची मोकळी जागा’ दर्शविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६मध्ये सुधारणा केली जाणार आहे.
या अधिनियमातील तरतुदीनुसार शहरी भागातील लोकांसाठी १० वर्षांच्या कालावधीसाठी निकषानुसार सोयीसुविधा उपलब्ध केल्या जातात. खेळाच्या मैदानावरील अतिक्रमण नियमित होऊ नये तसेच आरक्षणातील बदलासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी घेणे आवश्यक आहे.
रेशीमबाग मैदानाच्या पूर्वेकडे अंतर्गत रस्ता व त्यामागे निवासी क्षेत्र, उत्तर दिशेला ३० मीटर रेशीमबाग रस्ता आहे. या मैदानातील १२२१५.९५ चौरस मीटर क्षेत्र क्रीडांगणातून वगळून कम्युनिटी सेंटरसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. या जागेच्या उत्तर-पूर्व क ोपऱ्यात व सध्याच्या क्रीडा मैदानाच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यातील दक्षिणेकडील जागा सार्वजनिक, गैरसार्वजनिक विभागात समाविष्ट करण्यात आली आहे.
या दोन जागांतील वाचलेल्या जागेचा एक पट्टा नियोजनाच्या दृष्टीने सार्वजनिक, गैरसार्वजनिक विभागात समाविष्ट करणे आवश्यक आहे. या फेरबदलासंदर्भात ३० आॅक्टोबर २००९ला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव पारित करून तो मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. नगररचना संचालकांच्या शिफारशीनुसार या फेरबदलाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
नवीन आराखड्यात रेशीमबाग हे क्रीडा मैदान
नागपूर शहर विकासाच्या नवीन आराखड्यात रेशीमबाग मैदान हे क्रीडा मैदान दर्शविण्यात आले आहे. आरक्षण नियोजन प्राधिकरण म्हणून नागपूर महापालिका दर्शविण्यात आली आहे. या मैदानाच्या दक्षिणेकडील जागा नागपूर सुधार प्रज्ञासने हेडगेवार स्मारक समितीला यापूर्वीच लीजवर देण्यात आली आहे.