सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटलांचा जीव वाचला पाहिजे; रामदास आठवलेंचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 06:08 PM2023-11-01T18:08:46+5:302023-11-01T18:09:09+5:30
केवळ मराठा समाजाचा प्रश्न नाही तर क्षत्रिय विषय आहे. उद्धव ठाकरेंनी सूचना केल्याप्रमाणे पंतप्रधान यांना भेटून हा विषय मांडू असंही रामदास आठवलेंनी म्हटलं.
मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वात पहिली मागणी मी आणि माझ्या पक्षाने केली होती. सगळ्याच मराठ्यांना आरक्षण नको, परंतु ज्यांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे अशांना आरक्षण द्यावे. मराठा समाजाची आंदोलनं याआधी तीव्र झालेली नाही. परंतु आता आंदोलन तीव्र झालं आहे. टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटलांचा जीव वाचला पाहिजे असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
रामदास आठवले म्हणाले की, सध्या मराठा आरक्षणाचा विषय तीव्र झालेला आहे. जरांगे पाटील आणि इतर नेते उपोषणास बसले आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटील यांचा जीव वाचला पाहिजे. अनेकांनी मागणी केली आहे की एक दिवसांचं अधिवेशन घ्यावं पण माझीही मागणी आहे की दोन दिवस अधिवेशन बोलवून चर्चा करावी. तामिळनाडूमध्ये ६९ टक्के आरक्षण आहे. राजस्थानला ६५ टक्के आरक्षण आहे. इतरांना अडचणीत न आणता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत माझ्या खात्याच्या निगडित काही प्रश्न आहेत. मराठा समाजात गरीब मराठ्यांची संख्या आहे. लवकर निर्णय घ्यावा पण थोडा वेळ याला लागू शकतो. जरांगे पाटील यांनी त्यावर विचार करावा. सरकारला वेळ देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात आंदोलन होतायत. कायदा हातात घेऊ नका. केवळ मराठा समाजाचा प्रश्न नाही तर क्षत्रिय विषय आहे. उद्धव ठाकरेंनी सूचना केल्याप्रमाणे पंतप्रधान यांना भेटून हा विषय मांडू असंही रामदास आठवलेंनी म्हटलं.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला सांगितलं म्हणून देणार नाही. त्यांच्या काळात हा मुद्दा होता त्यांना हाताळता आला नाही. इतरांना अडचणीत न आणता मराठा समाजाला आरक्षण द्यावं ओबीसीत कोणाला टाकायचं याचा आमच्या मंत्रालयाला प्रस्ताव दिला तर आम्ही ते पुढे करू आणि आरक्षण देण्याचा प्रयत्न करु. मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना केली आहे की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण देखील आंदोलन करा. इतर राज्याच्या आरक्षणाचा अभ्यास करून आपल्याकडे काय करता येतंय याचा विचार राज्य सरकारने करावा. जरांगे यांची गरज मराठा समाजाला आहे. त्यांच्या भूमिकेने मराठा समाज खडबडून जागा झाला आहे असंही आठवलेंनी सांगितले.