गवळीचा पॅरोल २६ मेपर्यंत
By admin | Published: May 23, 2015 01:24 AM2015-05-23T01:24:37+5:302015-05-23T01:24:37+5:30
मुंबई येथील कुख्यात डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडीला २६ मेपर्यंत अभिवचन रजा (पॅरोल) वाढवून देण्यात आली आहे.
नागपूर : मुंबई येथील कुख्यात डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडीला २६ मेपर्यंत अभिवचन रजा (पॅरोल) वाढवून देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अवकाशकालीन न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांनी शुक्रवारी यासंदर्भात अंतरिम आदेश दिला.
गवळीचा मुलगा महेशचे ९ मे रोजी मुंबईत लग्न होते. त्यासाठी न्यायालयाने ३० एप्रिल रोजी गवळीला १५ दिवसांची सशर्त अभिवचन रजा मंजूर केली होती. त्याची ही रजा गुरुवारी संपली आहे. तत्पूर्वी त्याने १३ मे रोजी नागपूर विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर करून आईच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी अभिवचन रजा ३० दिवसांनी वाढवून देण्याची विनंती केली होती. त्याची आई ८६ वर्षांची आहे.
विभागीय आयुक्तांनी अर्जावर तातडीने निर्णय न घेतल्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली. यादरम्यान विभागीय आयुक्तांनी गवळीचा अर्ज फेटाळून लावला. शुक्रवारी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर पुढील मुद्दे विचारात घेण्यासाठी प्रकरणावरील सुनावणी २६ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यासोबतच गवळीच्या रजेतही २६ मेपर्यंत वाढ करण्यात आली.