जीपीओ दोन दिवस बंद, १७ पोस्ट कार्यालयेही तीन दिवस ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 06:17 AM2018-05-04T06:17:03+5:302018-05-04T06:17:03+5:30
मुंबई जीपीओ कार्यालय व दक्षिण मुंबईतील १७ सब पोस्ट कार्यालयांमध्ये कोअर सिस्टीम इंटिग्रेशन (सीएसआय) ही संगणकीकृत प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी शनिवारपासून तीन दिवस कामकाज पूर्णत: बंद ठेवण्यात येणार
मुंबई : मुंबई जीपीओ कार्यालय व दक्षिण मुंबईतील १७ सब पोस्ट कार्यालयांमध्ये कोअर सिस्टीम इंटिग्रेशन (सीएसआय) ही संगणकीकृत प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी शनिवारपासून तीन दिवस कामकाज पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच जीपीओचे कामकाज रविवार व सोमवारी बंद राहील. सलग तीन दिवस पोस्टाच्या विविध सेवा बंद राहणार असल्याने ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
मुंबई जीपीओचे संचालक के. मुनिरामय्या यांनी सांगितले की, सीएसआय प्रणालीचे काम शनिवारपासून सुरू होणार असल्यामुळेच दक्षिण मुंबईतील १७ सब पोस्ट कार्यालये शनिवार, रविवार, सोमवार अशा प्रकारे तीन दिवस तर जीपीओ रविवार तसेच सोमवारी बंद राहील. सध्या मुंबई जीपीओद्वारे दर महिन्याला सुमारे ९५ हजार तर दररोज ३ हजारपेक्षा जास्त रजिस्टर लेटर पाठवण्यात येतात. इलेक्ट्रॉनिक मनीआॅर्डर पाठविण्याचे प्रमाण दरमहा सरासरी ५ हजार तर दररोज सरासरी १६६ इतके आहे. स्पीड पोस्टद्वारे पत्र पाठविण्याचे प्रमाण दरमहा साधारणत: ३४ हजार असून दररोजचे प्रमाण सरासरी ११००पेक्षा जास्त आहे. सीएसआय प्रणालीमुळे स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट, मनीआॅर्डर व इतर कामांवर आॅनलाइन देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.
सन २०१२पासून पोस्ट कार्यालयाच्या कामकाजाचे संगणकीकरण करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. कोअर बँकिंग सोल्युशन (सीबीएस)द्वारे देशातील तब्बल २५ हजार पोस्ट कार्यालये एकमेकांशी जोडण्यात आली आहेत. त्याचाच पुढचा भाग म्हणून सीएसआय प्रणाली राबविण्यात येत आहे.