दहावी निकालाच्या जीआरने अधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट, शिक्षण विभागाचा ‘अभ्यास’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 08:43 AM2021-05-29T08:43:36+5:302021-05-29T08:43:59+5:30
SSC Exams: शुक्रवारी राज्य शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा न घेता निकाल कसा लावावा याबाबत ११ पानी जीआर निर्गमित केला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
यवतमाळ : दहावीची परीक्षा यंदा कोरोनामुळे टळली. मात्र, या परीक्षेने खुद्द अधिकाऱ्यांचीच परीक्षा पाहिली. शुक्रवारी राज्य शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा न घेता निकाल कसा लावावा याबाबत ११ पानी जीआर निर्गमित केला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या ११ पानी जीआरचा अभ्यास करता करता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.
दहावीसारखे महत्त्वाचे वर्ष असूनही विद्यार्थ्यांंना शाळेत बसून अभ्यास करता आला नाही तरीही त्यांचा निकाल लावण्याची कठीण जबाबदारी शिक्षण विभागावर आली आहे. शासनाने शुक्रवारी जाहीर केलेल्या निर्णयात गुणदान करण्याच्या किचकट पद्धती सांगितल्या. वर्षभर शाळाच भरलेली नसताना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण कसे द्यावे, हा प्रश्न शिक्षक-मुख्याध्यापकांसह अधिकाऱ्यांपुढेही निर्माण झाला आहे. मध्यंतरी केवळ महिना-दीड महिना दहावीचे वर्ग भरले. मात्र, त्यात केवळ २५ टक्के हजेरी होती. तेवढ्या आधारावर सर्वच विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कसे शक्य होईल, हा प्रश्न आहे.
आता नववीच्या परीक्षेवरून दहावीच्या विद्यार्थ्यांना ५० गुण, वर्षभरातील लेखी मूल्यमापनाच्या आधारे ३० गुण, दहावीतील तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या आधारे २० गुण अशा शंभर गुणांचे मूल्यमापन करून दहावीचा निकाल लावला जाणार आहे. मात्र, हे मूल्यमापन नेमके कसे करावे हा प्रश्न शाळांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी ११ पानी जीआर जाहीर होताच शिक्षकांची व अधिकाऱ्यांची त्रेधा उडाली. हा जीआर क्षणार्धात प्रत्येक शिक्षकाच्या मोबाईलमध्ये पोहोचला. मात्र, त्यातील किचकट बाबी पाहून शिक्षकच विद्यार्थ्यांसारखे जीआरचा ‘अभ्यास’ करताना आढळले. राज्य शासनाने दहावीच्या बाबतीत आधीच गोंधळ केला होता. त्यात शुक्रवारच्या निर्णयाने आणखी भर पडली, अशी प्रतिक्रिया ‘शिक्षक भारती’चे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी नोंदविली.
निकाल तयार करताना अशा आहेत अडचणी
शासन म्हणते....
- नववीच्या परीक्षेवरून दहावीच्या निकालात ५० गुण द्यावे
- वर्षभरात झालेल्या अंतर्गत लेखी मूल्यमापनावरून दहावीच्या विद्यार्थ्यांना ३० गुण द्यावे
- दहावीच्या तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षेला २० गुण देणार
अडचण...
- गेल्यावर्षी नववीची वार्षिक परीक्षाच झाली नाही.
- यंदा दहावीचे वर्ग न झाल्याने अंतर्गत लेखी मूल्यमापन झालेलेच नाही तर गुण कसे द्यावे?
- यंदा दहावीची तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा झालीच नाही.