‘पदवी प्रवेश आॅनलाइनमधूनच द्या’
By admin | Published: August 2, 2016 05:57 AM2016-08-02T05:57:39+5:302016-08-02T05:57:39+5:30
मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना १६ आॅगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार
मुंबई : मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना १६ आॅगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयांसाठी आॅनलाइन प्रवेश पूर्व नोंदणी केली आहे, त्याच महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेश देण्यात यावा, असा आदेश विद्यापीठाने दिला आहे.
आॅनलाइन प्रवेश पूर्व नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण महाविद्यालयांना देता येणार नाही, असेही विद्यापीठाने बजावले आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांवर व्यवस्थापन किंवा इतर कोट्यातून प्रवेश घेण्याची सक्तीही महाविद्यालयांना करता येणार नाही, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. आॅनलाइन जागा दडवून कोट्यातील प्रवेश भरणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती विद्यापीठाने दिली.
मुंबई आणि ठाण्यासह अनेक ठिकाणच्या महाविद्यालयांमध्ये पदवीच्या प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया ही १९ जुलै रोजीच संपल्याची अफवा पसरवली जात आहे. व्यवस्थापन कोट्यातील जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, म्हणून हा प्रकार आहे. जागांची माहिती बहुतेक महाविद्यालयांनी फलकावर लावलेली नाही, असा आरोप विद्यार्थी संघटनांमधून होत आहे. यासंदर्भात तक्रारी आल्यास विद्यापीठाकडून संबंधित महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची संधी : ज्या महाविद्यालयांत प्रवेशाच्या जागा शिल्लक आहेत, तिथे विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. प्रवेशाची संपूर्ण माहिती विद्यापीठाला मिळणार असून, विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेश पूर्व नोंदणीनुसारच प्रवेश घेण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.