पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राज्यातील परिवर्तनाची नांदी ठरेल: चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 04:45 PM2020-12-01T16:45:14+5:302020-12-01T16:47:32+5:30
दवीधर व शिक्षक निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेचा कौल नक्की कुणाच्या बाजूने आहे याची पूर्णपणे जाणीव होईल..
पुणे : राज्यात पदवीधर व शिक्षक मतदार संघांसाठी मंगळवारी ( दि. १) मतदान होत आहे. या निवडणुकीत पुणे मतदारसंघ वगळता राज्यात इतर ठिकाणी राष्ट्रवादी व भाजपा यांच्यातच थेट लढत होत आहे. त्यामुळे प्रमुख भाजप व राष्ट्रवादी यांच्यासह मनसेने देखील ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीत भाजपच्या विजयाची खात्री व्यक्त करतानाच महाविकास आघाडीला जोरदार निशाणा साधला आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल ३ तारखेला जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील मतदारांचा कौल स्पष्ट करताना आगामी निवडणुकांच्या धर्तीवरही निवडणूक महाविकास आघाडी व भाजप यांच्यासाठी फार महत्वाची ठरणार आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले,राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी भाजपाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद करतो. पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी होणारी निवडणूक महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. तसेच ही निवडणूक राज्यातील महाविकास आघाडीला एक मोठा हादरा देणारी असणार आहे. लोकाशाहीमध्ये जनतेकडे मतदान हेच एकमेव असे प्रभावी शस्त्र आहे, जे सरकारला त्यांच्या अपयशी कारभाराची जाणीव करून देतो. या निवडणुकीच्या माध्यमातून लोक आघाडी सरकारला किती कंटाळले आहेत हे समजेल. यासोबतच सरकारमध्ये नसूनही ज्या प्रकारचे समर्थन पदवीधर आणि शिक्षकांनी आमच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण राज्यात केले, ते फारच उत्साहवर्धक होते. या निवडणुकीमुळे सरकारच्या बहुमताला काही फरक पडणार नाही, मात्र पुढे तरी सरकार जनहितार्थ कार्य करण्याचा विचार तरी करेल, अशी इच्छा व्यक्त करतो.”
पदवीधर व शिक्षक निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेचा कौल नक्की कुणाच्या बाजूने आहे याची पूर्णपणे जाणीव होईल असेही पाटील यावेळी म्हणाले.