पदवीधर, शिक्षक निवडणूक : कोकणामध्ये सर्वाधिक ९१% मतदान, नाशिक, अमरावतीत मतदारांची पाठ; ४९.२८ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 09:50 AM2023-01-31T09:50:15+5:302023-01-31T09:50:37+5:30

Vidhan parishad Election: महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच  मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडले. नाशिक, अमरावतीतील राजकीय अनिश्चिततेचा फटका पदवीधर उमेदवारांना बसला

Graduate, Teacher Elections: Highest 91% voter turnout in Konkan, Nashik, Amravati voter turnout; 49.28 percent voting | पदवीधर, शिक्षक निवडणूक : कोकणामध्ये सर्वाधिक ९१% मतदान, नाशिक, अमरावतीत मतदारांची पाठ; ४९.२८ टक्के मतदान

पदवीधर, शिक्षक निवडणूक : कोकणामध्ये सर्वाधिक ९१% मतदान, नाशिक, अमरावतीत मतदारांची पाठ; ४९.२८ टक्के मतदान

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच  मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडले. नाशिक, अमरावतीतील राजकीय अनिश्चिततेचा फटका पदवीधर उमेदवारांना बसला असून, केवळ ४९ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. शिक्षक मतदारसंघात औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ टक्के आणि कोकण विभागात ९१.०२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपच्या युतीची पहिलीच निवडणूक आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कमी मतदानाची नोंद झाली. नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील यांच्यात अटीतटीचा सामना आहे. सत्यजित तांबे यांना भाजपने जाहीर पाठिंबा दिला नसला तरी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पाठिंबा दिल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली. 

अमरावती : लिंगाडे-पाटील लढत
अमरावती : पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी ४९.६७ टक्के मतदान झाले. यापूर्वी २०१७ मध्ये ६३.५२ टक्के मतदान झाले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे आणि भाजपचे डॉ. रणजित पाटील यांच्यात कुणाचा विजय होणार हे गुरुवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

नागपूर : गुरुजींचे बंपर व्होटिंग
नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघात गुरुजींनी बंपर सरासरी ८५ टक्के मतदान केले. सर्वच जिल्ह्यांत मतदानाची टक्केवारी वाढल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार व महाविकास आघाडी समर्थित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्यात ‘टफ फाइट’ होईल, असे चित्र मतदानाअंती समोर आले.

कोकण : थेट लढत
नवी मुंबई : बहुचर्चित कोकण शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ९१.२ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत आठ उमेदवार असले, तरी खरी लढत भाजप-शिंदे गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्यातच आहे. या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात सुमारे ८८ टक्के, पालघर जिल्ह्यात ८७ टक्के, रायगड जिल्ह्यात ९३ टक्के, रत्नागिरीत ९४ टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९७ टक्के मतदान झाले.

मराठवाडा : सर्वांत कमी मतदान
औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी विभागात शांततेत मतदान पार पडले. सरासरी ८६.०१ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून सर्वाधिक ९२.३८ टक्के मतदान उस्मानाबाद जिल्ह्यात झाले, तर सर्वांत कमी ७९.४० टक्के मतदान औरंगाबाद जिल्ह्यात झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. विक्रम काळे यांनी लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे किरण पाटील यांनी अपर तहसील कार्यालय, औरंगाबाद येथे मतदान केले. मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव यांनी कंधार तालुक्यात मतदानाचा हक्क बजावला. शिक्षक सेनेचे मनोज पाटील यांनी रेल्वे स्टेशन भागातील केंद्रावर मतदान केले.

नाशिक : ग्रामीण भागात निरुत्साह, शहरात रांगा
    नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा अपवाद वगळता, काही मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या. 
    शहरी भागात मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला.
    निवडणूक रिंगणातील सोळा अपक्ष उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असले, तरी सत्यजीत तांबे व शुभांगी पाटील या दोन्ही अपक्ष उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे. अपक्ष म्हणून रिंगणात उमेदवार उतरल्याने प्रचाराचा लवाजमा, सभा, मेळाव्यांना फाटा देण्यात आला होता. 

Web Title: Graduate, Teacher Elections: Highest 91% voter turnout in Konkan, Nashik, Amravati voter turnout; 49.28 percent voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.