पदवीधर मतदार वाढले

By admin | Published: June 8, 2014 12:59 AM2014-06-08T00:59:22+5:302014-06-08T01:20:43+5:30

२00९ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पदवीधर मतदारांच्या यादीत सरासरी ८८ हजारावर मतदारांची भर पडली आहे. यात विशेष मोहिमेत नोंदवलेल्या १0 हजार मतदरांचा समावेश आहे.

Graduate voters increased | पदवीधर मतदार वाढले

पदवीधर मतदार वाढले

Next

विधान परिषद निवडणूक : ८८ हजारावर मतदारांची भर
नागपूर : २00९ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पदवीधर मतदारांच्या यादीत सरासरी ८८ हजारावर मतदारांची भर पडली आहे. यात विशेष मोहिमेत  नोंदवलेल्या १0 हजार मतदरांचा समावेश आहे.
विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी येत्या २0 जून रोजी मतदान होणार असून त्यासाठी एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत.  निवडणुकीसाठी विभागीय प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. यासंदर्भात शनिवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली व  त्यात सबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असे, विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या पूर्वीच्या मतदार यादीत एकूण मतदारांची संख्या १ लाख ९९ हजार होती. अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या  पुरवणी यादीत ही संख्या २ लाख ७७0७४ वर गेली आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत विभागातील एकूण सहा  जिल्ह्यातून सरासरी १0 हजार मतदारांनी नावे नोंदवली. त्यामुळे एकूण मतदारांची संख्या २ लाख ८७ हजार झाली आहे. आयुक्त कार्यालयाच्या  संकेतस्थळावर अंतिम आणि पुरवणी यादी १३ जूनपर्यंंत टाकण्यात येणार आहे, असे अनुपकुमार यांनी स्पष्ट केले.
मतदान केंद्र
सहाही जिल्ह्यात सकाळी ८ ते दुपारी ४  वाजेपर्यंंत मतदान होईल. त्यासाठी एकूण ३१७ मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. त्यात नागपूरमध्ये  १७८, भंडारा २३, गोंदिया २२, च ंद्रपूर ४४ व गडचिरोलीतील १८ केंद्राचा समावेश आहे. एका केंद्रावर ८00 ते १४00 मतदारांना मतदान करता  येईल. एकूण १५00 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाईल.
पसंतीक्रमानुसार मतदान
या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान होते. प्रत्येक उमेदवारापुढे मतदारांना पसंतीक्रम (आकड्यात) लिहावा लागणार आहे. शब्दामध्ये पसंती क्रम  लिहिल्यास मतपत्रिका बाद ठरवण्यात येणार आहे. मतदारांना सर्वच उमेदवारांच्या नावापुढे पसंती क्रमांक द्यायचा आहे. मतदारांना सर्वच उमेदवारांच्या  नावापुढे पसंती क्रमांक लिहायचा नसेल तरी हरकत नाही. पण किमान एका उमेदवारापुढे पसंती क्रमांक लिहिणे बंधनकारक आहे. कोरी मतपत्रिका  बाद ठरवण्यात येणार आहे.
नकारात्मक  मतदानाचा पर्याय
निवडणुकीत नकारात्मक मतदानाचा (नोटा) पर्याय देण्यात आला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात एकूण १४ उमेदवार आहेत. मतपत्रिकेवर या  सर्वांंची नावे असतील व सर्वात शेवटी म्हणजे १५ व्या क्रमांकावर ‘नोटा’चा रकाना असेल.
रिंगणातील उमेदवारांपैकी एकही पसंत नसेल तर मतदारांना ‘नोटा’चा पर्याय निवडता येईल.  मात्र तो निवडताना एकाही उमेदवाराच्या नावापुढे  मतदारांना पसंतीक्रमांक लिहिता येणार नाही. तसे केल्यास मत बाद ठरेल.
स्वत:चा ‘पेन’ वापरता येणार नाही
मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावापुढे खूण करण्यासाठी मतदारांना वेगळा पेन मतदान केंद्रावर देण्यात येईल.
मतदार स्वत:चा पेन वापरू शकणार नाही. त्याने तो वापरल्यास मतपत्रिका वैध ठरविली जाईल.
मतमोजणी
२0 तारखेला मतदान झाल्यानंतर सर्व सहाही जिल्ह्यांतून मतपेट्या नागपूर येथे आणण्यात येणार असून, २४ तारखेला येथील सिव्हिल लाईन्समधील  प्रोव्हिडन्स गर्ल्स हायस्कूलमध्ये सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यासाठी २४ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून, ४८  कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाईल. दरम्यान, निवडणुकीदरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील मतदान केंद्रावर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार  असून, व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Graduate voters increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.