पदवीधर, शिक्षक निवडणुकांचे बिगुल वाजले, १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान अर्ज नोंदणीची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 06:50 AM2022-09-27T06:50:39+5:302022-09-27T06:50:53+5:30
अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार
मुंबई : नाशिक व अमरावती या विभागांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या; तर औरंगाबाद, नागपूर व कोकण या विभागांमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका २०२३ मध्ये होणार आहेत; मात्र त्यासाठी नोंदणी प्रक्रिया येत्या १ ऑक्टोबरपासून सुरू होत असून ७ नोव्हेंबरपर्यंत पात्र शिक्षक व पदवीधरांना अर्ज करण्याची मुदत राहणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी मोहीम सुरू करण्यासंदर्भात देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.
महत्त्वाचे म्हणजे पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्ष, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी किंवा रहिवासी कल्याणकारी संस्थांकडून एकगठ्ठा स्वरूपात प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे श्रीकांत देशपांडे यांनी स्पष्ट केले. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्धी केली जाईल, अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती देशपांडे यांनी यावेळी दिली.
निवडणूक जानेवारीत?
नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघ, तर औरंगाबाद, नागपूर, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होणार असून या जागांवरील सदस्यांची मुदत ७ जानेवारी २०२३ रोजी संपत आहे. त्यामुळे जानेवारीत निवडणूक होण्याची शक्यता आहे.
मुदत संपत असलेल्या शिक्षक आमदारांत औरंगाबादचे विक्रम काळे, कोकणचे बाळाराम पाटील, तर पदवीधर मतदारसंघातील नागपूरचे आमदार नागो गाणार, अमरावतीचे डॉ. रणजित पाटील, नाशिकचे डॉ. सुधीर तांबे यांचा समावेश आहे.
कसा करावा अर्ज?
- पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज क्र. १८ भरून पदवीधर मतदार नोंदणी करू शकतात.
- अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध.
- अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राची किंवा गुणपत्रिकेची साक्षांकित छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
- १ ऑक्टोबरपर्यंत पदवीधर मतदारसंघाकरिता ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्याचा प्रयत्नही करण्यात येणार आहे.