पदविकेचे श्रेणीवर्धन, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना नुकसानाची पदवी
By admin | Published: October 20, 2016 09:32 PM2016-10-20T21:32:59+5:302016-10-20T21:32:59+5:30
पदविका अभ्यासक्रम गुंडाळला जाणार असून, त्यात सर्वसामान्य वर्गातील मुलांचे विशेषत: अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे बरेच नुकसान होणार आहे.
ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. २० : शासकीय तंत्रनिकेतनचे श्रेणीवर्धन करण्याच्या नावाखाली पदविका अभ्यासक्रम गुंडाळला जाणार असून, त्यात सर्वसामान्य वर्गातील मुलांचे विशेषत: अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे बरेच नुकसान होणार आहे. महाराष्ट्रात रत्नागिरी, यवतमाळ, धुळे, जालना, लातूर आणि सोलापूर अशा सहा ठिकाणी हे श्रेणीवर्धन होणार असून, पदविका अभ्यासक्रम बंद करून पदवी अभ्यसक्रम सुरू केला जाणार आहे.
महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबतचा अध्यादेश १३ आॅक्टोबर रोजी जारी केला आहे. त्यानुसार राज्यातील सहा शासकीय तंत्रनिकेतनमधील पदविका अभ्यासक्रमांचे श्रेणीवर्धन केले जाणार असून, तेथे पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय वरकरणी लाभदायी वाटत असला तरी पदविका अभ्यासक्रम टप्प्याने बंद करण्यात येणार असल्याचे या अध्यादेशातच नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षातच रत्नागिरी, यवतमाळ, धुळे, जालना, लातूर आणि सोलापूर या सहाही ठिकाणी पदविका अभ्यासक्रमाची पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया होणार नाही.
दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. सध्या दहावीच्या निकालातील टक्केवारी वाढली असल्याने पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रत्नागिरीतील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविकेच्या पहिल्या ववर्षाची प्रवेश क्षमता ४८0 इतकी आहे. यात जागा शिल्लक राहण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जर पदविका अभ्यासक्रम बंद झाला तर या सर्व विद्यार्थ्यांना एकतर खासगी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घ्यावा लागेल किंवा जिल्ह्याबाहेरील (मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये जावे लागेल. सर्वसामान्य मध्यमवर्गाला खासगी तंत्रनिकेतनचे शुल्क परवडणारे नाही. शुल्काचा विचार करता त्यांना शासकीय तंत्रनिकेतनसाठी जिल्ह्याबाहेर जावे लागेल. मात्र जिल्ह्याबाहेर शिक्षण घेणे तितकेसे सोपे नाही, असे अनेक विद्यार्थी आहेत. त्यांचे या शासन निर्णयामुळे नुकसानच होणार आहे.
ज्या सहा पदविका अभ्यासक्रमांचे श्रेणीवर्धन होणार आहे, त्या सहाही ठिकाणी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी दुसरी स्वतंत्र शिफ्ट राबवली जाते. जर पदविका अभ्यासक्रम बंद झाला तर या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना त्याचा अधिक मोठा फटका बसणार आहे. मच्छीमार समाजातील मुले आता अभियांत्रिकी प्रवाहात मोठ्या संख्येने येत आहेत. पदविका अभ्यासक्रमामुळे त्यांना छोट्या-मोठ्या नोकऱ्या उपलब्ध होत असल्याने त्यांच्यासाठी तोच मोठा आधार आहे. मात्र तो बंद झाला तर त्यांना मोठा फटका बसणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आजच्या घडीला अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पाच पदवी महाविद्यालये आहेत. त्यांच्याकडेच प्रवेशाच्या जागा रिक्त राहत असताना आणखी पदवी महाविद्यालय कशासाठी, असामोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
७0 : ३0च्या निकषात स्थानिकांचा तोटाच
ज्या जिल्ह्यात शासकीय पदविका, पदवी अभ्यासक्रम आहे, त्या जिल्ह्यातील ७0 मुलांना तेथे प्रवेश मिळतो आणि ३0 टक्के मुले ही बाहेरील जिल्ह्यातील असतात. जर पदविका अभ्यासक्रम बंद झाला आणि त्यासाठी ही मुले परजिल्ह्यात गेली तर त्या जिल्ह्यात त्यांना ३0 टक्के कोट्यातून प्रवेश घ्यावा लागेल. त्यामुळे त्यांना प्रवेश मिळण्यावर मर्यादा येतील. तीच मुले जेव्हा पदवी घेण्यासाठी आपल्या जिल्ह्यात परत येतील, तेव्हा त्यांनी पदविका इतर जिल्ह्यात घेतली असल्यामुळे स्वत:च्या जिल्ह्याच्या ७0 टक्के कोट्यातून प्रवेश मिळणार नाही. त्यांचा समावेश ३0 टक्के कोट्यामध्येच केला जाईल. या परिस्थितीचा विचार न करताच हा निर्णय घेण्यात आला आहे.
सक्षमता खरेच आहे का?
पदविका अभ्यासक्रमाचे पदवी अभ्यासक्रमात श्रेणीवर्धन करताना तशा शिक्षकांची गरज आहे. त्यादृष्टीने रत्नागिरी, यवतमाळ, धुळे, जालना, लातूर आणि सोलापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये सक्षम आहेत का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वच ठिकाणी शिक्षक अपुरे आहेत.