शिक्षक भरतीच्या विलंबामुळे पात्रताधारकांच्या नैराश्यात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 07:16 PM2018-11-19T19:16:32+5:302018-11-19T19:28:53+5:30
राज्यात शिक्षक भरतीवर घालण्यात आलेली स्थगिती उठवली जाईल या आशेवर डि.एड, बी.एड. पात्रताधारक आलेला दिवस ढकलत आहेत.
पुणे : राज्यात मागील ८ वर्षांपासून शिक्षक भरतीच झालेली नाही. या कालावधीमध्ये हजारो डि.एड. व बी.एड. पदवीधारक पदव्या घेऊन बाहेर पडले, मात्र शासन केवळ पात्रता परीक्षा, अभियोग्यता चाचणी अशा परीक्षा घेण्यापलीकडे काहीच हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे पात्रताधारकांमध्ये मोठयाप्रमाणात नैराश्याची भावना निर्माण झाली असल्याचे डि.एड., बी.एड. पात्रताधारकांनी सांगितले.
प्राध्यापक, प्राचार्यांच्या भरतीवरील स्थगिती उठविण्यात आली आहे, त्यापाठोपाठ आता शिक्षक भरतीवरीलही स्थगिती उठेल अशी अपेक्षा पात्रताधारकांना वाटत होती, मात्र ती फोल ठरली आहे. राज्यात ७ ते ८ लाख डि.एड, बी.एड. पात्रताधारक आहेत. शिक्षक भरतीवर घालण्यात आलेली स्थगिती उठवली जाईल या आशेवर ते आलेला दिवस ढकलत आहेत. मात्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक भरती करण्यासाठी दिलेली कुठलीच डेडलाइन पाळलेली नाही. जून २०१८ पर्यंत शिक्षक भरतीला सुरूवात होईल असा शब्द त्यांनी दिला होता, मात्र त्यांना तो पाळता आला नाही. राज्यात शिक्षकांच्या एकूण रिक्त जागा किती आहेत, त्यापैकी किती जागा भरल्या जाणार आदींची कुठलीच माहिती पात्रताधारकांना मिळत नसल्याचे डि.एड, बी.एड. पात्रताधारक संघटनेच्या उपाध्यक्ष प्राजक्ता गोडसे यांनी सांगितले. संघटनेच्यावतीने सातत्याने शिक्षक भरतीवरील स्थगिती उठविण्यासाठी आंदोलन केले जात आहे. जिल्हास्तराव तसेच शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक यांच्या कार्यालयासमोर अनेकदा धरणे आंदोलन करण्यात आले. तरीही शासनाला जाग येत नसल्याने पुन्हा एकदा येत्या २६ नोव्हेंबर पासून पात्रताधारकांच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे.
डि.एड, बी.एड पात्रताधारक अनेक मुला-मुलींचे करिअरच धोक्यात आले आहे, त्यामुळे शासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शिक्षक भरती तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
..................
परीक्षांवर परीक्षा मात्र हाती काहीच नाही
राज्य शासनाने २०१३ पासून ६ वेळा पात्रता परीक्षा घेतल्या. त्याचबरोबर
गुणवत्तेच्या आधारावर पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करण्यासाठी अभियोग्यता चाचणीही घेतली. त्याची गुणवत्ता यादी जाहीर केली. पवित्र पोर्टलवर उमेदवारांची नोंदणीही झाली. मात्र शिक्षक भरतीवरील बंदी उठविण्याबाबत पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही.शिक्षण व्यवस्थेचे भवितव्य धोक्यात
डि.एड., बी.एड केल्यानंतर पूर्वी शाळांमध्ये सहज नोकरी मिळून जायची. त्यामुळे दहावी-बारावीमध्ये सर्वाधिक गुण मिळविणारे बहुतांश विद्यार्थी डि.एड, बी.एडकडे वळायचे. मात्र गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरतीवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे या पदव्यांना काहीच महत्त्व उरलेले नाही. नवी पिढी शिक्षकी पेशाला सरळ नकार देऊ लागली आहे, त्यामुळे यापुढील काळात गुणवंत शिक्षकांचा मोठा वानवा निर्माण होणार असून शिक्षण व्यवस्थेचे भवितव्यच धोक्यात येईल.
-महानंदा कोत्तावर, डि.एड पात्रताधारक