ग्रामपंचायतीला ठोकले टाळे
By Admin | Published: October 8, 2016 01:02 AM2016-10-08T01:02:29+5:302016-10-08T01:02:29+5:30
तरुणांना नोकरी देत नसल्याच्या निषेधार्थ उपसरपंच , सदस्य व तरुणांनी उर्से ग्रामपंचायतीला शुक्रवारी टाळे ठोकले.
उर्से : ग्रामपंचायत हद्दीतील कंपन्यांमध्ये गावातील तरुणांना नोकरी देत नसल्याच्या निषेधार्थ उपसरपंच , सदस्य व तरुणांनी उर्से ग्रामपंचायतीला शुक्रवारी टाळे ठोकले. कंपन्यांच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा तरुणांनी दिला असून, जोपर्यंत मुलांना कामावर घेत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत बंद ठेवण्यात येणार आहे. दोन दिवसांत बैठक घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनांकडून सांगण्यात आले.
अनेक दिवसांपासून गावातील बेरोजगार मुले फिनोलेक्स व फिनिक्स या कंपनीत कामावर घ्यावे, यासाठी ग्रामपंचायतीकडे मागणी करीत होते. याची दखल घेऊन ग्रामपंचायतीने फिनिक्स या कंपनीकडे ५ व ६ आॅगस्ट रोजी पत्रव्यवहार केला होता. मात्र, दोन महिने होऊनही कंपनीने कोणतीही दखल घेतली नसल्याने तरुण संतप्त झाले आहेत. बेरोजगारी आणि ग्रामपंचायतीचा पाठपुरावा कमी पडतोय का? याचा राग मनात धरून तरुणांनी सकाळी साडेनऊ वाजता ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. जोपर्यंत गावातील मुले कामाला घेत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. कार्यालयाला टाळे ठोकल्यामुळे ग्रामपंचायत कामगार आणि ग्रामसेवकांना बाहेरच उभे राहावे लागले. सरपंच ऊर्मिला धामणकर, उपसरपंच उत्तम पोटवडे, ग्रामपंचायत सदस्य भरत कारके, सुलतान मुलाणी, अमर शिंदे, चंद्रकात धामणकर, अविनाश कारके, माजी सरपंच दिगंबर राऊत , भास्कर ठाकूर, सतीश कारके, तंटामुक्त अध्यक्ष प्रल्हाद पिसाळ, राजू पठाण , गुलाब धामणकर, जालिंधर धामणकर, भाऊ ठाकूर, गुरुदास दौंड, सचिन ठाकूर, अविनाश शिंदे, किरण राऊत, समीर शिंदे, आकाश धामणकर, विजय कारके, लालू दौंड, देविदास सावंत, रमेश गायकवाड, बंडू धामणकर व गावातील तरुणांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. (वार्ताहर)
>तळेगावात बैठक : ग्रामस्थांशी चर्चा करणार
ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकल्यानंतर तळेगाव पोलीस स्टेशन येथे कंपनीचे अधिकारी, पोलीस निरक्षक वसंत बाबर व ग्रामस्थ यांच्यात बैठक झाली. या वेळी दोन दिवसांत बैठक ग्रामपंचायतीबरोबर घेऊन चर्चा करू, असे कंपन्यांच्या वतीने सांगण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फतच तरुणांना कामाला घ्यावे, अशी भूमिका तरुणांनी घेतली आहे. याबाबत उपसरपंच पोटवडे म्हणाले, कंपनी कुठल्याही प्रकारची दाद देत नसल्याने आम्हाला टाळे ठोकावे लागले. कंपनीने लवकरात लवकर मुलांना कामावर घ्यावे, अशी आमची मागणी आहे.