ग्रामपंचायतींना हवीय मुंबईत जागा !
By Admin | Published: November 14, 2015 03:39 AM2015-11-14T03:39:09+5:302015-11-14T03:39:09+5:30
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सरकारी कामानिमित्त मुंबईला जावे लागते. मात्र राहण्याची व्यवस्था नसल्याने हॉटेल किंवा इतरत्र राहण्याशिवाय पर्याय नसतो
जगदीश कोष्टी, सातारा
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सरकारी कामानिमित्त मुंबईला जावे लागते. मात्र राहण्याची व्यवस्था नसल्याने हॉटेल किंवा इतरत्र राहण्याशिवाय पर्याय नसतो. मुंबईत प्रत्येक ग्रामपंचायतीला हक्काची जागा मिळावी, यासाठी वाई तालुक्यातील ‘यशवंत आवास विकास मंडळी’ संस्थेच्या पुढाकारातून राज्यातील ७,३०० ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव करून मुंबईला पाठविले आहेत.
शेतकऱ्यांपासून विविध घटकांना कामानिमित्त मुंबईला जावे लागते. मात्र मुक्काम करण्याची वेळ आलीच तर काय करायचे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्याची सोडवणूक करण्यासाठी यशवंत संस्थेची स्थापना झाली.
राज्यातील ३५८ तालुक्यांतील २७ हजार ९०३ ग्रामपंचायती व ४४ हजार ७०० महसुली गावांशी संस्थेने पत्रांद्वारे संपर्क साधला. त्यासाठी संस्थेचे विजय यादव यांनी ४ लाख रुपये खर्च केले.
विशेष म्हणजे पत्र मिळाल्यानंतर मुंबईत सुमारे दीड हजार फुटांचे मोफत घर मिळावे म्हणून ७,३०० ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव केले, तसेच हक्काच्या घरासाठी वाई तालुक्यातील वेळे येथील ‘यशवंत आवास विकास मंडळी’ संस्थेला अधिकारही दिले आहेत.