सर्वाेत्कृष्ट आमदारांचा ‘लोकमत’ करणार गौरव
By admin | Published: July 28, 2016 05:05 AM2016-07-28T05:05:22+5:302016-07-28T13:39:06+5:30
‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वाेत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. ही घोषणा लोकमत
- विधिमंडळ पुरस्कार देणारे ‘लोकमत’ पहिले वृत्तपत्र
मुंबई : ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वाेत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. ही घोषणा लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन विजय दर्डा यांनी येथे केली. असे पुरस्कार देणारे ‘लोकमत’ हे पहिले वृत्तपत्र आहे. स्वातंत्र्य दिनाच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त हा गौरव सोहळा आयोजित करण्यात येत आहे.
संसदीय कार्याच्या माध्यमातून देशाचे, समाजाचे कल्याण आणि जनतेच्या आशा-आकांक्षांना वास्तवात आणण्याचे काम होते. संसद आणि विधिमंडळाने लोककल्याणाचे मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्त्वाचे कायदे करण्याचे काम केले आहे, परंतु अलीकडच्या काळात संसद असो की, देशभरातील विधिमंडळे, यात विविध अंगाने चर्चा, सकस वादविवाद न होता सभागृह बंद पाडणे, चर्चा न होणे व गोंधळात विधेयके मंजूर करून घेणे, असे प्रकार सातत्याने घडताना दिसतात. समाजधुरिणांना, विचारवंतांना जशी याविषयी काळजी आहे तसेच कोट्यवधी जनतेला अपेक्षाभंगाचे दु:ख आहे. कारण सुसह्य जीवन जगण्यासाठी, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी जनतेला याच सभागृहांकडून अपेक्षा आहेत. बेचैन असलेल्या तरुण पिढीचा सभागृहांविषयीचा आदर कमी होऊ नये या प्रामाणिक हेतूने या पुरस्कारांचे आयोजन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवार दि. ३ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याची माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
मान्यवरांचे ज्युरी मंडळ
- पुरस्कारांसाठी ज्युरी मंडळ स्थापन करण्यात आले असून, त्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आणि ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर या मान्यवरांचा समावेश आहे.
- ज्युरी मंडळ विधिमंडळात जनतेच्या आशा-आकांक्षांची परिपूर्ती करणाऱ्या आदर्श प्रतिनिधींची ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ यासाठी निवड करणार असून, लवकरच ज्युरी मंडळाची बैठक होईल.