सिंधुदुर्गवासीयांचे ग्रामदैवत सातेरीदेवी, उद्योगनगरीतील शक्तिपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:55 AM2017-09-22T00:55:26+5:302017-09-22T00:55:28+5:30
यमुनानगर, निगडी येथील श्री सातेरीदेवीचे मंदिर सिंधुदुर्गवासीयांचे ग्रामदैवत आहे. १९९९मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणी बांधवांनी एकत्र येऊन सातेरीदेवीच्या मंदिराची उभारणी केली.
यमुनानगर, निगडी येथील श्री सातेरीदेवीचे मंदिर सिंधुदुर्गवासीयांचे ग्रामदैवत आहे. १९९९मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणी बांधवांनी एकत्र येऊन सातेरीदेवीच्या मंदिराची उभारणी केली. गगनगिरीमहाराज यांच्या हस्ते २५ आॅक्टोबर २००७ रोजी मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
मंदिराच्या कळसाचे बांधकाम व नक्षीकाम २००८ रोजी पूर्ण झाले. लोणावळा येथील फलाहारीमहाराज यांच्या हस्ते कलशारोहणाचा कार्यक्रम झाला. या वर्षी मंदिराच्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
भजन, दांडिया, मंगळागौरीचे खेळ, फुगड्यांचे खेळ, तसेच महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. येथे अष्टमीला चंडिका होमही केला जातो. दसºयाच्या दिवशी कोकणी पद्धतीने सोने लुटण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. मंदिराचे अध्यक्ष विजय परब आहेत, कार्याध्यक्ष प्रकाश भोसले, तर चिटणीस वसंत कदम आहेत.
मंदिराच्या माध्यमातून कोकणी बांधवांनी एकात्मतेचा संदेश दिला आहे. गावाकडील कार्यक्रमांप्रमाणेच या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात. जेणेकरून नोकरी-व्यवसायातून गावाकडे जाता आले नाही, याचे शल्य मनाला लागू नये. पुरुषांसाठी दांडिया हा वेगळा प्रयोग मंडळाने राबवला आहे. सातेरीदेवी सेवा ट्रस्ट, उत्सव समिती, सल्लागार समिती, सातेरीदेवी महिला व श्रीसुक्त मंडळ, महिला भजनी मंडळ आदींच्या माध्यमातून वर्षभर मंदिरात विविध उपक्रम सुरू असतात. नवरात्रीमध्ये दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. भजन, कीर्तनाबरोबरच महिला-मुलांसाठी पाककला, चित्रकला, मेंदी व रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात येतात. दसºयाला सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचा कार्यक्रम असतो.