‘कचरा बंद’वर ग्रामस्थ ठाम
By admin | Published: January 2, 2015 12:52 AM2015-01-02T00:52:05+5:302015-01-02T00:52:05+5:30
उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांबरोबर झालेल्या चर्चेत काल कचराप्रश्नावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे उरुळी देवाची व फुरसुंगी येथील ग्रामस्थ कचरा बंद आंदोलनवर ठाम आहेत.
पुणे : उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांबरोबर झालेल्या चर्चेत काल कचराप्रश्नावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे उरुळी देवाची व फुरसुंगी येथील ग्रामस्थ कचरा बंद आंदोलनवर ठाम आहेत. त्यामुळे महापालिकेने कचऱ्याच्या प्रश्नावर कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठकीमध्ये केली.
उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी पुण्यातील कचरा फुरसुंगी येथील डेपोत टाकण्यास विरोध केला आहे. त्यामुळे पुण्यातील कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. या वेळी बापट बोलत होते. या वेळी राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर दत्तात्रय धनकवडे, विभागीय आयुक्त विकास देशमुख, महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार आदी उपस्थित होते. बैठकीपूर्वी बापट आणि शिवतारे यांनी फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोस भेट देऊन पाहणी केली आणि माहिती घेतली.
बापट म्हणाले, ‘‘कचरा जिरवण्यासाठी पालिकेने विविध पर्याय शोधले पाहिजेत. शहरातील कचऱ्यावर शहरामध्येच प्रक्रिया करता येईल अशा दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर कचरा डेपोसाठी जागा हा पर्याय उपलब्ध ठेवावा. प्रशासनाने कचरा प्रकल्पासंदर्भात एक सविस्तर अहवाल सादर करावा . शासनानेसुद्धा कचरा डेपोच्या जागेसंदर्भात निश्चित कालावधी स्पष्ट करावा. कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये.’’
या वेळी शिवतरे म्हणाले, महापालिकेने पाणीपुरवठा योजनेचा निधी तत्काळ निधी द्यावा. कचरा डेपोमधील कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी, अशा सूचना त्यांनी केल्या.(प्रतिनिधी)
४फुरसुंगी व उरुळी देवाची ग्रामस्थांनी आज आंदोलन पुकारल्याने सकाळी पालकमंत्र्यांनी कचरा डेपो व प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली. त्याच वेळी ग्रामस्थांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
४पालकमंत्र्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना चार दिवसांत हा आराखडा करण्यास सांगितले आहे.
४हा आराखडा आल्यावर दोन्ही गावांचे ग्रामस्थ चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे कचरा डेपो हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे यांनी सांगितले. हे आंदोलन शेवटचे करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
पालकमंत्र्यांची आज
नगरसेवकांबरोबर बैठक
४पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शहरातील घनकचरा व्यवस्थापनावरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी महापालिका भवनात सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक बोलावली आहे.
४कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी त्या-त्या प्रभागांमध्ये लोकप्रतिनिधींनी ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून घेणे, प्रभागात बायोगॅस, गांडूळखत असे प्रकल्प उभारणे या विषयांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
कचरा व्यवस्थापनात
टोलचा भुर्दंड
४शहरातील ओला कचरा शहराबाहेरील गावांमधील १० ते १२ शेतकऱ्यांच्या शेतात खत म्हणून जिरवण्याचे काम पालिका प्रशासनाने सुरू केले आहे.
४परंतु हा कचरा शहराबाहेर घेऊन जाणाऱ्या एका वाहनासाठी सुमारे ६०० ते ७०० रुपये
खर्च येत आहे. परिणामी पालिका प्रशासनाला कचरा व्यवस्थापनासाठी टोलचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
पालिकेने केले कचरा व्यवस्थापन
पुणे : फुरसुंगी व उरुळी देवाची या कचरा डेपोवर कचरा टाकण्यासाठी येथील ग्रामस्थांनी दिलेली मुदत संपल्यामुळे स्थानिक नागरिकांनी कचरा कॉपिंगला अटकाव केला. यावर उपाय म्हणून शहरातून जमा केलेला सुमारे ७०० ते ७५० टन ओला व सुका कचरा पालिकेच्या दिशा, रोकेम व अजिंक्य या कचराप्रक्रिया प्रकल्पांवर प्रक्रियेसाठी नेल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कचरा व्यवस्थपाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने पालिका प्रशासनाने स्वत:च शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम अधिक प्रभावीपणे सुरू केले.फुरसुंगी व उरुळी देवाची या कचरा डेपोवर पालिकेतर्फे एकही गाडी पाठविण्यात आली नाही. पालिकेने १७0 टन ओला कचरा शहराबाहेरील दहा ते
पंधरा शेतकऱ्यांच्या शेतातील खड्ड्यात खत होण्यासाठी टाकला. कात्रज येथून ७ गाड्या, घोले रस्ता येथून ३
तर हडपसर येथून ६ ओल्या कचऱ्याच्या गाड्या शहराबाहेर पाठवण्यात आल्या. सुका कचरा हा दिशा, अजिंक्य आणि रोकेम प्रकल्पांवर प्रक्रियेसाठी नेण्यात आला.
पालिकेच्या १५० घंटागाड्या व स्वच्छ संस्थेच्या कचरावेचकांकडून ओल्या व सुक्या कचऱ्यांचे वर्गीकरण करण्यात आले. गुरुवारी सुमारे ७०० ते ७५० टन कचरा गोळा झाला. विविध क्षेत्रीय कार्यालय परिसरातून जवळपास १७ गाड्यांमधून ओला आणि सुका कचऱ्याची वाहतूक करण्यात आली. शहरातील प्रत्येक प्रभागातील कचरा त्याच प्रभागात जिरवण्यासाठी आणखी काही कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालय परिसरातील मोकळ्या जागा कचरा वर्गीकरणासाठी देण्यात याव्यात असे नुकतेच संबंधित विभागाला कळविले आहे.
शहरात तयार होणारा ओला व सुका कचरा त्या-त्या प्रभागात वर्गीकरण करून संकलित केल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा कसा होईल, याकडे लक्ष दिले जाणार आहे, असे महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले.
शहरातील जवळपास पाच ते सहा क्षेत्रीय कार्यालय परिसरातून १७ गाड्या कचरा वाहून नेण्यात आला. हा कचरा बायोगॅस प्रकल्प, गांडूळखत व वीजनिर्मिती प्रकल्पांवर प्रक्रियेसाठी पाठण्यात आला. रोकेम येथील प्रकल्पामध्ये ब्लेड बदलण्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये त्यांची क्षमता ४०० ते ४५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यापर्यंत वाढणार आहे. परिणामी कचरा व्यवस्थापन करणे अधिक सुलभ होणार आहे.