पीककर्जासाठी ग्रामीण बँकेच्या मुख्यालयास टाळे
By admin | Published: June 2, 2016 02:35 AM2016-06-02T02:35:01+5:302016-06-02T02:35:01+5:30
पीककर्जाच्या मागणीसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुख्यालयासमोर तीन दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी अखेर या बँकेच्या मुख्यालयास टाळे ठोकले
औरंगाबाद : पीककर्जाच्या मागणीसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुख्यालयासमोर तीन दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी अखेर या बँकेच्या मुख्यालयास टाळे ठोकले. बँक अधिकाऱ्यांनी पीक कर्जाचे थांबलेले वाटप लगेचच सुरू करण्याचे आश्वासन दिल्यावर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखांमधून शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप बंद झाले आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर बँकेकडून कर्ज मिळत नसल्यामुळे मराठवाड्यातील शेकडो गावांतील हजारो शेतकरी अडचणीत आले आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी सोमवारपासून बँकेच्या औरंगाबादेतील मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले; परंतु बुधवारी सकाळपर्यंतही बँकेकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (भाकपा) राज्य कार्यकारिणी सदस्य राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या मुख्यालयास टाळे ठोकले.
महाराष्ट्र ग्रामीण बँक ही बँक आॅफ महाराष्ट्रशी संलग्न आहे. त्यामुळे बँक आॅफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक देशपांडे आणि सहकार खात्याचे सहनिबंधक राजेश सुरवसे तासाभरात घटनास्थळी दाखल झाले. देशपांडे यांनी पीककर्ज वाटपासाठी ग्रामीण बँकेला पाचशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)