एकनाथ शिंदेंसह मंत्र्याचा भव्य नागरी सत्कार; २३ जानेवारीला शिवसेनेचा 'विजयोत्सव'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:53 IST2025-01-20T15:51:47+5:302025-01-20T15:53:01+5:30
संपूर्ण मतदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कुणी पुढे घेऊन जात असतील तर ते एकमेव एकनाथ शिंदे आहेत असं शेवाळेंनी म्हटलं.

एकनाथ शिंदेंसह मंत्र्याचा भव्य नागरी सत्कार; २३ जानेवारीला शिवसेनेचा 'विजयोत्सव'
मुंबई - २३ जानेवारीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असून हा दिवस शिवसैनिक उत्साहाने साजरा करतात. हीच परंपरा राखून यंदाचा २३ जानेवारी दिवस शिवसेनेकडून 'विजयोत्सव' साजरा करण्यात येणार आहे. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे पक्षाला लोकसभा, विधानसभेत यश मिळालं. त्यामुळे एकनाथ शिंदेंसह सर्व सहकारी मंत्री, आमदार, खासदारांना भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती माजी खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकारांना दिली.
राहुल शेवाळे म्हणाले की, जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी जो उठाव करत ऐतिहासिक निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जाण्याचा जो संकल्प घेतला. हा संकल्प लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण झाला. हेच औचित्य साधून शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या वतीने २३ जानेवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकारी मंत्री यांच्यासह पक्षातील सर्व आमदार, खासदार यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. हिंदुत्वाचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेऊन शिवसैनिकांना एकत्र घेऊन एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला, त्यामुळे लोकसभा, विधानसभेत महायुतीला यश प्राप्त झाले. त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेला जे यश मिळाले ते ऐतिहासिक आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच निवडणुकीत शिवसेनेचे ७ खासदार आणि ५७ आमदार निवडून आले. उबाठापेक्षा १५ लाख मते अधिक मिळाली, संपूर्ण मतदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कुणी पुढे घेऊन जात असतील तर ते एकमेव एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे २३ जानेवारीला जो काही विजय पक्षाला प्राप्त झाला तो बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित करण्यात येणार आहे. त्यामुळे भव्य नागरी सत्कार होणार आहे. महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या हस्ते २३ जानेवारीला हा सत्कार करण्यात येणार आहे. बीकेसीला संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडेल असंही राहुल शेवाळे यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार
दरम्यान, मुंबई महापालिकेची निवडणूक आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. शिवसेना आणि मुंबई महापालिकेचे भावनिक नाते आहे. नेहमीच मुंबईतल्या जनतेने धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचा महापौर निवडून दिलेला आहे. २३ जानेवारीला हा संकल्प शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा केला जाईल. येत्या काळात शिवसेनेचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकवला जाईल आणि महायुतीचा महापौर बसेल हा संकल्प भव्य नागरी सत्काराच्या कार्यक्रमातून करण्यात येईल. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शाखानिहाय बैठका घेऊन पदाधिकारी, शाखाप्रमुखांची संवाद साधला जाणार आहे. नवी कार्यकारणी दुसऱ्या आठवड्यापर्यंत घोषित केली जाईल. या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली जाईल. २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी जिल्हानिहाय दौरा, सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.