राजमाता अहिल्यादेवींनी पंढरीत स्थापिले श्रीरामाचे भव्य मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 02:17 PM2019-05-31T14:17:57+5:302019-05-31T14:23:03+5:30
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरात अनेक ठिकाणी महादेवाच्या मंदिरांची स्थापना केली.
प्रभू पुजारी
पंढरपूर : ‘चंद्रभागा तीरी उभी पंढरी’ असे म्हटले जाते़ त्याच चंद्रभागेच्या काठावर अहिल्यादेवी होळकर यांनीही एक चिरेबंदी वाडा बांधला आहे़ विविध ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी शिवलिंगांची स्थापना केली; मात्र केवळ पंढरीत या एकाच ठिकाणी या वाड्यात श्रीराम आणि हनुमानाच्या मंदिराची स्थापना केली. अहिल्यादेवींच्या विविध कार्यापैकी पंढरपुरातील हे एक आगळेवेगळे कार्य असल्याचे दिसून येते.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरात अनेक ठिकाणी महादेवाच्या मंदिरांची स्थापना केली. त्या-त्या ठिकाणी धर्मशाळा काढल्या; मात्र पंढरपुरात त्यांचे एक वेगळेच कार्य दिसून येते़ १७६८ साली अहिल्यादेवी होळकर यांनी श्रीरामाचे मंदिर बांधले. राजमाता अहिल्यादेवींनी सर्वत्र महादेवाच्या मंदिरांची स्थापना केली, पण पंढरपुरातच श्रीरामाचे मंदिर का बांधले? असा प्रश्न पडतो़ याबाबत अधिक माहिती घेतली असता, जेव्हा या वाड्याच्या बांधकामासाठी पाया खोदला जात होता. तेव्हा पाया खोदताना मारुतीची स्वयंभू मूर्ती सापडली, त्यामुळेच येथे श्रीराम आणि मारुती मंदिराची स्थापना केली. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची संगमरवरी दगडातील आकर्षक व सुबक मूर्ती आजही येथे पाहावयास मिळते.
या मंदिरात शिवलिंग आणि नंदीही आहे़ समोरच हनुमानाचे मंदिर आहे. शिवाय राजमाता अहिल्यादेवींचे नातू काशीराव दादा होळकर यांनी श्रीराम मंदिरातच राजमाता अहिल्यादेवी यांची संगमरवर दगडातील आकर्षक मूर्ती बनवून त्याची प्रतिष्ठापना केली आहे. सध्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चॅरिटीज ट्रस्ट इंदोर अंतर्गत सेवक म्हणून गिरीष बोरखेडकर हे काम पाहत आहेत.
गेली १५० वर्षे झाली, परंतु चंद्रभागा काठावरील हा होळकरवाडा तसाच मजबूत आहे़ चंद्रभागा काठी असल्याने अनेकवेळा महापूर येऊन गेला पण त्याचा काहीच परिणाम या वाड्यावर झालेला दिसून येत नाही़ यावरून हा वाडा किती मजबूत आहे हे दिसून येते.
असा आहे होळकर वाडा
- चंद्रभागा नदीच्या काठावर, महाद्वार घाटावर आणि विठ्ठल मंदिराच्या पूर्व दिशेला चिरेबंदी असा होळकरवाडा आहे़ सुमारे दोन एकर परिसरात दगडामध्ये हा वाडा बांधला आहे. या वाड्याच्या पश्चिमेस आणि दक्षिणेस प्रवेशद्वार आहे. या वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेस तर श्रीराम मंदिराकडे जाण्यासाठी दक्षिणेस महाद्वार घाटाशेजारी प्रवेशद्वार आहे़ पश्चिम प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर चिरेबंदी भव्य वाडा दिसतो़ ओसरीतून आत गेल्यानंतर मोकळे अंगण दिसते़ पुढे एक चौकशी कट्टा आहे़ अंगणाच्या चारही बाजूंनी बांधकाम आहे़ चौकोनी दगडावर सागवानी खांब उभे करून त्या खांबावर आकर्षकपणे मांडणी करून छत उभारण्यात आले आहे़ आजही या वाड्याच्या बांधकामाची मांडणी लक्ष वेधून घेते़ शिवाय या वाड्यात राजमाता अहिल्यादेवी यांचा अर्धाकृती पुतळाही आहे़
आगळेवेगळे शिवलिंग
- होळकर वाड्यातील श्रीराम मंदिरात एक आगळेवेगळे शिवलिंग पाहावयास मिळते़ एक शिवलिंग (पिंड) असून त्यावर ११ शिवलिंग कोरलेले आहे़ शिवाय शेजारी नंदी आहे. या आगळ्यावेगळ्या शिवलिंगाची आणि नंदीची प्रतिष्ठापनाही अहिल्यादेवी होळकर यांनी केल्याचे सांगण्यात आले़