आजीच्या गर्भाशयातून नातीचा जन्म!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:42 AM2018-10-19T05:42:20+5:302018-10-19T05:42:36+5:30

पुणे : प्रत्यारोपण केलेल्या गर्भाशयातून देशातील पहिल्या चिमुकलीचा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जन्म झाला. जगातील हे बारावे बाळ ठरले आहे. ...

Granddaughter birth from grandmother | आजीच्या गर्भाशयातून नातीचा जन्म!

आजीच्या गर्भाशयातून नातीचा जन्म!

googlenewsNext

पुणे : प्रत्यारोपण केलेल्या गर्भाशयातून देशातील पहिल्या चिमुकलीचा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जन्म झाला. जगातील हे बारावे बाळ ठरले आहे. जन्माला आलेली मुलगी तिच्या आजीच्या गर्भाशयातून जन्माला आली आहे.


पुण्यातील गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये या मुलीचा जन्म झाला आहे. तिचे वजन १४५0 ग्रॅम असून आई आणि तिची तब्येत ठणठणीत आहे. मीनाक्षी बालंद (वय २८) असे आईचे नाव असून त्या बडोदा येथील आहेत. लग्नानंतर विविध कारणांमुळे त्यांचा तीन वेळा गर्भपात झाला होता. त्यातच त्यांचे गर्भाशय निकामी झाल्याने पुन्हा आई होण्याची आशाही मावळली होती. पण आई होण्याची आस त्यांना अजिबात स्वस्थ बसू देत नव्हती.
त्यांना मूल दत्तक घेणे व सरोगसीचा पर्याय होता. पण त्यांनी ते नाकारून गर्भाशय प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. मुलीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांची आई सुशीलाबेन (वय ४८) यांनी आपले गर्भाशय देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार १७ मे २०१७ रोजी प्रत्यारोपण करण्यात आले, अशी माहिती गॅलेक्सी केअर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली.


प्रत्यारोपित गर्भाशय व्यवस्थित काम करू लागल्याने प्रयोगशाळेत तयार केलेला गर्भ मार्च महिन्यात त्यात सोडण्यात आला. गर्भधारणाही यशस्वीपणे झाली. तेव्हापासून मीनाक्षी रुग्णालयातच आहेत. आई व बाळाच्या प्रत्येक हालचालीवर डॉक्टर लक्ष ठेवून होते. बुधवारी रात्री गर्भाशयातील पाण्याची पातळी कमी होत चालल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला. रात्री १२ वाजून १२ मिनिटांनी गोंडस मुलीचा जन्म झाला. ज्या गर्भाशयातून तिच्या आईचा जन्म झाला, त्याच गर्भाशयातून तिचाही जन्म झाला आहे.

जगभरात प्रयोग
आतापर्यंत जगात २७ गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याद्वारे ९ स्वीडन आणि अमेरिकेत २ अशा एकूण ११ मुलांचा जन्म झाला आहे. गॅलेक्सीमधील मुलगी जगातील बारावी तर भारतातील पहिली ठरली आहे. रुग्णालयात एकूण सहा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या असून, त्यातूनही यशस्वीपणे बाळे जन्माला येतील, अशी आशा डॉ. पुणतांबेकर यांनी व्यक्तकेली.

Web Title: Granddaughter birth from grandmother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.