अकोल्यात वंचितच्या बड्या माजी महिला नेत्याच्या नातीचे अपहरण; पोलिसांकडून शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 08:05 IST2025-03-05T08:04:38+5:302025-03-05T08:05:41+5:30
Crime news Akola: अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या एका माजी बड्या महिला नेत्याच्या नातीचे अपहरण करण्यात आले आहे.

अकोल्यात वंचितच्या बड्या माजी महिला नेत्याच्या नातीचे अपहरण; पोलिसांकडून शोध सुरु
राज्यात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. आधी सामान्य लोकांना याचा त्रास होत होता, आता राजकारण्यांच्या घरापर्यंत गुन्हेगार पोहोचू लागले आहेत. पुण्यातील केंद्रीय मंत्र्याच्या कर्मचाऱ्याला मारहाण, भाजपच्या एका महिला खासदाराच्या मुलीची छेडछाड आणि आता अकोल्यात वंचितच्या बड्या महिला नेत्याच्या नातीचे अपहरण अशा घटनांनी महाराष्ट्र हादरू लागला आहे.
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या एका माजी बड्या महिला नेत्याच्या नातीचे अपहरण करण्यात आले आहे. अकोल्यातल्या कृषी नगर भागातल्या एका नामांकित इंग्लिश स्कूल परिसरातून या 12 वर्षीय मुलीचे अपहरण झाले आहे. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी रात्री मुलीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरु केला आहे. मुलीच्या शोधासाठी दोन पथक स्थापन करण्यात आली आहेत. अगदी गजबजलेल्या वस्तीतून दुपारी 3 वाजताच्या सुमारास मुलीच अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रात्रीपर्यंत पाच ते सहा जणांची चौकशी केली आहे.
काहीही करा पण माझ्या नातीला शोधून द्या, असा टाहो अपहरण झालेल्या मुलीच्या आजीने पोलीस स्टेशन परिसरात फोडला होता. ही अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर शाळेबाहेर गेली होती. ती घरी परतली नाही. यामुळे तिचे वडील पोलिस ठाण्यात आले होते. पोलीस तपास करत आहेत. जर कोणी तिला फुस लावून नेले असेल तर तिचा शोध घेऊन आरोपीला पकडण्यात येणार असल्याचे जयवंत सातव, ठाणेदार, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन, अकोला यांनी सांगितले आहे.