नात जन्मल्याचा आनंद, हेलिकॉप्टरमधून आणले घरी; स्वागताचा जंगी सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 11:45 AM2022-04-28T11:45:21+5:302022-04-28T11:45:52+5:30
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
पुणे : ‘कन्यारत्न येती घरा, हर्षाला नसे सीमा’ या ओळी सार्थक ठरवीत बालेवाडी येथील शेतकरी अजित पांडुरंग बालवडकर यांनी ‘मुलगी हीच आपल्या वंशाचा दिवा आहे’ असं समजून नातीच्या जन्माचे जंगी स्वागत केले. सुनेचे माहेर मांजरी फार्म शेवाळवाडी, पुणे येथून सासरी पाटील वस्ती बालेवाडी पुणे येथील निवासस्थानी नातीला आणि सुनेला चक्क हेलिकॉप्टरने त्यांनी घरी आणले.
अजित पांडुरंग बालवडकर आणि संगीता अजित बालवडकर यांचा मुलगा कृष्णा बालवडकर, सून अक्षता बालवडकर यांना पहिला मुलगा क्रियांश असून, दुसरी मुलगी क्रिशिका आहे. अजित बालवडकर यांची इच्छा होती की, शाही थाटात नातीचे स्वागत करायचे, म्हणून माहेरातून सुनेला व क्रिशिका नातीला आणण्यासाठी त्यांनी चक्क हेलिकॉप्टर पाठविले. एवढेच नव्हे तर पाटील वस्ती बालेवाडी पुणे येथे हेलिपॅड निर्माण करण्यात आला. घरी वाजत, गाजत, फुलांनी सजविलेल्या कारने नातीला घरी आणले.
मागास विचारांना तिलांजली
नातीला चक्क हेलिकॉप्टरने घरी आणल्याचा आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अजित पांडुरंग बालवडकर यांनी याद्वारे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा संदेशही दिला. भौतिकदृष्ट्या समाज कितीही सुधारला असला, तरी आजही ग्रामीण भागात मुलगी म्हणजे ओझे अशीच चुकीची समजूत कायम असल्याचे उघडकीस येणाऱ्या भ्रूणहत्यांवरून समोर येते. याला तिलांजली देत मुलीच्या जन्माच्या या जंगी स्वागताचे त्यामुळेच सर्वत्र कौतुक होत आहे.