आजोबांमुळे आले शिक्षण धोक्यात
By admin | Published: April 15, 2016 02:09 AM2016-04-15T02:09:54+5:302016-04-15T02:09:54+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरूड या गावी राहणाऱ्या ९० वर्षांच्या चुलत आजोबांनी दिलेल्या जबानीमुळे नवी मुंबईत खारघर येथील वायएमटी दंतवैद्यकीय महाविद्यालयात
मुंबई : गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरूड या गावी राहणाऱ्या ९० वर्षांच्या चुलत आजोबांनी दिलेल्या जबानीमुळे नवी मुंबईत खारघर येथील वायएमटी दंतवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या १९ वर्षांच्या नातीचे शिक्षण धोक्यात आले आहे.
चेंबूर येथील बीपीसीएल स्टाफ क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या नेहाश्री ज्ञानेश्वर सोनकुसरे या विद्यार्थिनीने, आपण ‘हलबा’ या अनुसूचित जमातीचे असल्याचा दाखला मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून घेतला होता. हा दाखला चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजच्या प्राचार्यांमार्फत पडताळणीसाठी जात पडताळणी समितीकडे पाठविला गेला. नेहाश्री ‘हलबा’ नव्हे, तर कोष्टी या जातीची आहे, असा निष्कर्ष काढून समितीने तिचा जातीचा दाखला अवैध ठरवून जप्त केला. नेहाश्री ‘हलबा’ जातीची नसूनही तिने फसवणुकीने तसा दाखला घेतला व त्याआधारे प्रवेश घेऊन खऱ्या अनुसूचित जातीच्या एका विद्यार्थ्यास प्रवेशापासून वंचित केले, असे मतप्रदर्शनही समितीने केले होते.
समितीच्या या निर्णयाविरुद्ध नेहाश्री हिने उच्च न्यायालयात केलेली रिट याचिका न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने फेटाळली. नेहाश्रीने आपल्या दाव्याच्या पुष्ठ्यर्थ स्वत:च्या वडिलांचा व दोन चुलत भावंडांचेही ‘हलबा’ जातीचे दाखले सादर केले होते, परंतु हे दाखले अनुसूचित जाती निर्धारित करणाऱ्या राष्ट्रपतींच्या आदेशानंतरचे आहेत. त्यामुळे नेहाश्रीच्या आजोबांनी दिलेल्या माहितीच्या तुलनेत या दाखल्यांचे पुरावामूल्य कमी आहे.
परिणामी, नेहाश्री ‘हलबा’ जातीची नाही व तिने त्या जातीचा खोटा दाखला घेतला होता, हा समितीने काढलेला निष्कर्ष चूक नाही, असे न्यायालयाने म्हटले.
महाराष्ट्रात लागू असलेल्या कायद्यानुसार, राखीव प्रवर्गातील व्यक्तीचा जातीचा दाखला पडताळणीत खोटा ठरला, तर त्या दाखल्याच्या आधारे घेतलेले लाभ (जसे शैक्षणिक प्रवेश, नोकरी वगैरे) रद्द करण्याची तरतूद आहे. यामुळे नेहाश्रीचा दंतवैद्यक महाविद्यालयातील प्रवेश धोक्यात येऊ शकतो. (विशेष प्रतिनिधी)
काय सांगितले आजोबांनी?
नेहाश्रीच्या दाखल्याच्या पडताळणीचे काम मुंबईतील समितीपुढे झाले. कार्यपद्धतीनुसार दक्षता पथकाकडून चौकशी झाली. नेहाश्री मुंबईतील असली, तरी त्यांचे कुटुंब मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील आहे, असे समोर आले. त्यामुळे मुंबईतील समितीने गडचिरोलीच्या समितीस चौकशी
करण्यास सांगितले.
गडचिरोली समितीचे दक्षता पथक सोनकुसरे यांच्या मूळ गावी गेले. तेथे त्यांना नेहाश्रीचे ९० वर्षांचे चुलत आजोबा केवलराम सीताराम सोनकुसरे भेटले. त्यांनी सांगितले की, ‘आमच्या घराण्याकडे कोणतीही वडिलोपार्जित शेतजमीन नाही. आम्ही पिढीजात कोष्टी (विणकर) आहोत.’