नातवाचा खून करून आजोबांची आत्महत्या

By admin | Published: March 20, 2016 04:28 AM2016-03-20T04:28:23+5:302016-03-20T04:28:23+5:30

भावाने जमिनीच्या वादातून न्यायालयात लावलेल्या दाव्यामुळे आलेल्या नैराश्यामधून आजोबांनी नातवाचा गळा आवळून खून केला. नंतर इमारतीच्या सातव्या मजल्यावरून

Grandfather's suicide by murder of his granddaughter | नातवाचा खून करून आजोबांची आत्महत्या

नातवाचा खून करून आजोबांची आत्महत्या

Next

पुणे : भावाने जमिनीच्या वादातून न्यायालयात लावलेल्या दाव्यामुळे आलेल्या नैराश्यामधून आजोबांनी नातवाचा गळा आवळून खून केला. नंतर इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी पहाटे कोंढव्यातील शांतीनगर सोसायटीमध्ये घडली. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त केली आहे.
जिनय परेश शहा (१०) असे खून झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. तर सुधीर दगडुमल शहा (६५, रा. एफ ७०१, शांतीनगर सोसायटी, कोंढवा, पुणे) यांनी आत्महत्या केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश शहा यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. शहा मूळचे शिरूरचे असून, दीड वर्षापूर्वी ते पुण्यात राहायला आले. त्यांना जिनयसह राजवी(३) ही मुलगी आहे. जिनय एका खासगी शाळेत चौथीमध्ये शिकत होता. त्याची नुकतीच परीक्षा संपली. परेश यांचे वडील सुधीर शहा यांचे शिरुरमध्ये किराणा मालाचे दुकान होते. त्यांच्या तीन भावांमध्ये मालमत्तेची वाटणी झालेली आहे. त्यांच्या वाट्याला आलेली मालमत्ता विकून ते पुण्यात राहायला आले. त्यांच्या एका भावासोबत मालमत्तेच्या कारणावरुन वाद सुरु आहे. या भावाने सुधीर यांच्यावर शिरुर न्यायालयामध्ये मारहाणीची केसही केलेली आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. त्यांची मानसिक स्थिती बिघडत चालली होती.
शुक्रवारी रात्री सर्वजण जेवण करुन झोपी गेले होते. परेश आणि त्यांची पत्नी मुलीसह बेडरुममध्ये झोपले होते. जिनय आजोबांसोबत हॉलमध्ये झोपला होता. शनिवारी पहाटे साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान सुधीर यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यानंतर नातवाचा गळा आवळून खून केला. त्याचा मृतदेह हॉलच्या दरवाजाच्या पाठीमागे भिंतीला टेकवून लपवून ठेवला. स्वत: सातव्या मजल्यावर जाऊन खाली उडी मारुन आत्महत्या केली. मोठा आवाज झाल्याने नागरिक गोळा झाले.
माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुधीर यांनी आत्महत्या केल्याचे चित्रीकरण सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले आहे. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)

आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी
‘‘मी सुधीर शहा (गुजर) लिहून ठेवतो की, माझ्या विरुद्ध कोर्टात कोणतेही कारण नसताना ३२६ चा खोटा दावा लावला आहे. त्यामुळे माझे मानसिक संतुलन बिघडले आहे. सदर दावा हा फक्त मानसिक त्रास देण्यासाठीच लावला आहे. माझ्या आयुष्याची १०-१५ वर्ष राहिली आहेत. ती कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात घालवून मानसिक त्रास सहन करण्यापेक्षा या कटकटीतून मुक्त होण्यासाठी मी हा मार्ग स्वीकारला आहे. माझ्याबरोबर मी जिनयला नेत आहे. कारण मी त्याला सोडून जाऊ शकत नाही. मी त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. मनावर दगड ठेवून मी त्याला बरोबर नेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या कृत्यास कोणालाही जबाबदार धरू नये. माझ्या कुटुंबातील कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये.’’


नैैराश्य आणि अतिप्रेम जिनयचा खून... 
हा त्याच्याप्रति असलेल्या अतिप्रेमातून झाल्याचे समोर आले आहे. सुधीर यांचा जिनयवर खूप जीव होता. जिनयला हृदयाचा आजार होता. त्याच्यावर यापूर्वी शस्त्रक्रियाही केलेली आहे. आपल्यानंतर त्याचे कसे होणार, त्याला कोणी सांभाळील की नाही, या भीतीने त्यांनी हे कृत्य केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Web Title: Grandfather's suicide by murder of his granddaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.